जीव धोक्यात घालून कुणीही असुरक्षित प्रवास करु नये – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई, दि. ८ : जालना-औरंगाबाद रेल्वेमार्गावर बदनापूर ते करमाडदरम्यान रेल्वे रुळांवर झोपलेल्या १६ जणांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खद, वेदनादायी आहे. लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या मजूरांची घरी परतण्याची अधिरता, तळमळ, चाललेली पायपीट मन विषण्ण करणारी आहे. परप्रांतीय मजूर बांधवांना त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी महाराष्ट्र सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. केंद्र व सबंधित राज्यांच्या सहकार्याने सर्व मजूरांना त्यांच्या राज्यांत पाठविण्यात येत आहे, परंतू आपला नंबर येईपर्यंत, त्यासाठीची व्यवस्था होईपर्यंत मजूरबांधवांनी धीर धरावा, जीव धोक्यात घालून असुरक्षित प्रवास करु नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

औरंगाबादनजिक रेल्वे रुळावर झालेल्या दुर्घटनेतील मृतांना उपमुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली. श्री.पवार म्हणाले की, महाराष्ट्राने लॉकडाऊन दरम्यान राज्यात ठिकठिकाणी अडकलेल्या साडे सहा लाख मजूर बांधवांच्या अन्नपाणी, निवारा, वैद्यकीय उपचारांची सोय केली, ती व्यवस्था आजही सुरु आहे, यापुढेही सुरु राहील. महाराष्ट्रात काम करणाऱ्या आमच्या परप्रांतीय मजूरबांधवांची राज्य शासन काळजी घेत असताना काहींचा असा अपघाती मृत्यू होणे दुर्दैवी, क्लेषदायक आहे.

राज्यात अडकलेल्या व आपापल्या राज्यात, घरी जावू इच्छिणाऱ्या मजूर बांधवांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. केंद्र आणि संबंधित राज्यांच्या सहकार्याने ही जबाबदारी पार पाडली जात आहे. टप्प्याटप्याने सर्वांना आपापल्या राज्यात जाता येणार आहे. ज्यांची इच्छा आहे त्या सर्वांना आपापल्या घरी जाता येईल. परंतू, त्यासाठी घाई करु नये. ही घाई जीवघेणी ठरु शकते. मजूर बांधवांनी जीव धोक्यात घालून असुरक्षित प्रवास करु नये, कोरोनाच्या संकटावर आपण सर्वांनी मिळून लढायचं आहे, जिंकायचं आहे. त्यासाठी प्रत्येकानं स्वत:ची, कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. सर्वांनी सुरक्षितता बाळगली पाहिजे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top