निघोज प्रतिनिधी:
भारतीय सैनिकांनी २६ जुलै १९९९ रोजी कारगील युद्धात पाकिस्तानवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या स्मृतिप्रीत्यर्थ, कारगील विजय दिनानिमित्त निघोज येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या युद्धात देशाचे रक्षण करताना भारताचे ५२७ सैनिक शहीद झाले होते. या अमर शहिदांच्या स्मृतीस निघोज येथील वेताळबाबा स्टेडियम येथे असलेल्या पारनेर तालुका आजी-माजी सैनिक संघटनेच्या कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार संघाचे प्रतिनिधी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहीद जवानांना श्रद्धांजली वाहताना कॅप्टन विठ्ठलराव वराळ म्हणाले, "कारगील युद्धात भारतीय सैनिकांनी अत्यंत कठीण परिस्थितीत पाकिस्तानशी लढा दिला आणि २६ जुलै १९९९ रोजी ऐतिहासिक विजय मिळवला. आपले सैनिक दिवस-रात्र सीमेवर खडा पहारा देऊन आपले कर्तव्य बजावत असतात, म्हणूनच आज देशातील जनता सुरक्षित आहे."
पुढे बोलताना त्यांनी वेताळबाबा स्टेडियमच्या उभारणीचा उल्लेख केला. ते म्हणाले, "सैनिक सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्याची देशाप्रती आणि समाजाप्रती असणारी सेवा थांबत नाही. याचे जिवंत उदाहरण म्हणजे आपले वेताळबाबा स्टेडियम आहे. मेजर विकास वराळ आणि आम्ही सर्वांनी एकत्र येऊन, संपूर्ण लोकसहभागातून या आदर्श स्टेडियमची उभारणी केली आहे."
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर विकास वराळ आणि भास्कर कवाद यांनी अत्यंत उत्कृष्ट रीतीने केले. कार्यक्रमाला उपस्थित सर्वांनीच शहिदांच्या बलिदानाला नमन करत 'भारत माता की जय' आणि 'अमर रहे अमर रहे, शहीद जवान अमर रहे' च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.


.gif)
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद