पारनेर / निघोज:
पारनेर तालुक्यातील देवीभोयरे, निघोज आणि परिसरातील वाड्या-वस्त्यांवर शाळकरी मुलींची छेडछाड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयित इसमामुळे खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारामुळे संतप्त ग्रामस्थांसह पालकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून, ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सुपा व पारनेर पोलीस ठाण्यात (निघोज दूरक्षेत्र) कठोर कायदेशीर कारवाईसाठी अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कोण आहे संशयित? असा होता वावर
पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीनुसार, संबंधित संशयित इसमाचे नाव मंगेश बर्डे (रा. हंगा, ता. पारनेर) असे आहे. हा इसम जिल्हा परिषद शाळा, अंबिका विद्यालय परिसर, स्वच्छतागृहाचा परिसर तसेच विविध वाड्या-वस्त्यांवर संशयास्पद हालचाली करताना दिसून आला आहे. शाळकरी मुलींनी त्याला त्याच्या ओळखीबद्दल विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देत तेथून पळ काढला. मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वीही त्याच्या विरोधात सुपा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.
डोंगरमाथ्यावर शोधमोहीम; तरुणांनी रचला वेढा
शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी सदर संशयित देवीभोयरे (मगरदरा खिंड), वडझिरे, पिंपरी आणि जलसेन या चार गावांच्या मध्यभागी असलेल्या डोंगरमाथ्यावर विनाशर्ट (उघड्या अंगाने) फिरताना निदर्शनास आला. काही धाडसी तरुणांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो मक्याच्या शेताचा आणि डोंगराचा आडोसा घेत जंगलात पसार झाला.
या घटनेची माहिती मिळताच देवीभोयरे गावाचे सरपंच श्री. अशोकराव मुळे यांनी तातडीने पुढाकार घेत स्थानिक तरुणांच्या मदतीने डोंगर परिसरात मोठी शोधमोहीम राबवली. तसेच घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
⚠️ पालकांसाठी व नागरिकांसाठी प्रशासनाचे महत्त्वाचे आवाहन
- विशेष काळजी: आपल्या लहान-मोठ्या मुलींना शाळेत सोडण्याची आणि सुटीनंतर घरी आणण्याची सुरक्षित जबाबदारी पालकांनी स्वतः घ्यावी.
- कायदा हातात घेऊ नका: संशयित इसम कोठेही आढळल्यास नागरिकांनी स्वतः कायदा हातात न घेता संयम बाळगावा आणि तात्काळ पोलीस किंवा स्थानिक तरुणांना माहिती द्यावी.
- तातडीची मदत: आपत्कालीन किंवा संकट समयी तत्काळ ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
📞 संबंधीत इसम आढळून आल्यास खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल करा.(Emergency Contacts):
- सरपंच श्री. अशोकराव मुळे: ९८५०१४१२६७
- PSI कोळपे (निघोज दूरक्षेत्र): ९८२२७८३३५२
- PC बोराडे: ७९७७४९३७००
- आपत्कालीन हेल्पलाईन: ११२



.gif)
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद