माणूस घडवणारा शिक्षण महर्षी -स्वर्गीय भास्करराव रासकर सर

0


            काही माणसे आपल्या आयुष्यात येतात आणि काळाच्या ओघात निघून जातात; पण काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की, त्यांचे जाणे म्हणजे केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नसतो, तर एका विचाराचा, एका युगाचा आणि एका आधारवडाचा निरोप असतो. स्व. भास्कररराव रासकर सर यांचे निधन ही अशीच मनाला चटका लावणारी घटना आहे. त्यांच्या जाण्याने शिक्षणक्षेत्राने एक दूरदृष्टीचा मार्गदर्शक, समाजाने एक संवेदनशील कार्यकर्ता आणि असंख्य विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याला दिशा देणारा आधार गमावला आहे.

“मोठे सर” हा शब्द त्यांच्या नावापुढे लावणे ही केवळ एक औपचारिकता नव्हती; तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला मिळालेला सन्मान होता. या संबोधनांमध्ये त्यांच्या मोठेपणापेक्षा त्यांच्या माणुसकीची उब अधिक जाणवत असे. मोठ्या पदावर असतानाही सामान्य माणसाशी सहजपणे संवाद साधणारा, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करणारा आणि शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे साधन मानणारा हा माणूस खऱ्या अर्थाने ‘मोठा’ होता.

संत निळोबाराय विद्यालयाच्या स्थापनेमागे सरांनी जे स्वप्न पेरले, त्याचे शब्दरूप म्हणजे “सूर्यासारखे तळपू” हे शाळेचे घोषवाक्य. हे केवळ भिंतीवर लिहिण्यासाठीचे वाक्य नव्हते; ते सरांच्या संपूर्ण जीवनदृष्टीचे सार होते. सूर्य स्वतः जळतो, स्वतःला झिजवतो, आणि तरीही तक्रार न करता जगाला उजेड देत राहतो — हीच शिकवण त्यांनी शाळेच्या पायामध्ये रुजवली. ज्ञानाने तळपणारा विद्यार्थी घडवायचा असेल, तर आधी शिक्षकाने आणि संस्थाचालकाने स्वतः तसे तळपावे लागते, जळावे लागते, झिजावे लागते — हा विश्वास घेऊनच त्यांनी संस्थेची पायाभरणी केली. आणि आज, त्यांच्या निधनाने असे वाटते की तो सूर्यच स्वतः विरून गेला — इतरांना प्रकाश देता देता स्वतः मात्र अंधारात विलीन झाला. जो दिवा हजारो दिवे पेटवत राहिला, तो दिवाच आज विझला, पण त्याने पेटवलेले दिवे आजही तेवत आहेत, आणि पुढेही तेवत राहतील.

स्व. भास्कररराव रासकर सर यांचे संपूर्ण जीवन शिक्षणाच्या सेवेला वाहिलेले होते. प्रयत्न शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी संचालक आणि बालभारतीचे संचालक अशी एक ना अनेक पदे भूषवत त्यांनी शिक्षणक्षेत्रात भरीव योगदान दिले. त्यांच्या कार्याचा आवाका केवळ शाळेपुरता किंवा एका संस्थेपुरता मर्यादित नव्हता. शिक्षणव्यवस्थेतील विविध स्तरांवर काम करताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबरच शिक्षकांच्या भूमिकेलाही महत्त्व दिले.

त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील धडे, परीक्षा आणि गुण नव्हते. शिक्षण म्हणजे माणूस घडविण्याची प्रक्रिया होती. ज्ञानाबरोबर विवेक, संस्कारांबरोबर सामाजिक जाणीव आणि यशाबरोबर जबाबदारी यांचा संगम त्यांच्या शैक्षणिक विचारांत दिसून येत असे. म्हणूनच त्यांच्या कार्यातून घडलेली माणसे हीच त्यांच्या जीवनकार्याची खरी स्मारके आहेत.

शिक्षणाची खरी ताकद समाजातील वंचित, गरजू आणि दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहोचण्यात आहे, हा विचार त्यांनी कृतीतून जगला. गरिबांसाठी शाळा उभी करण्यामागे त्यांची असलेली तळमळ ही त्यांच्या सामाजिक बांधिलकीची जिवंत साक्ष आहे. ज्यांच्या हातात साधने नाहीत, पण डोळ्यांत स्वप्ने आहेत, अशा मुलांना शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यातूनच प्रयत्न शिक्षण संस्थेचा जन्म झाला. एका मुलाच्या हातात पुस्तक देणे म्हणजे एका कुटुंबाच्या आणि पुढे एका पिढीच्या भविष्याला नवी दिशा देणे, या जाणिवेने त्यांनी काम केले.

त्यांच्या कार्याचा सामाजिक पैलूही तितकाच महत्त्वाचा होता. लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद अहमदनगरचे माजी सदस्य म्हणून त्यांनी समाजजीवनाचा जवळून अनुभव घेतला. त्यामुळे शिक्षण, समाज आणि प्रशासन यांच्यातील परस्परसंबंध त्यांना चांगला उमगला होता. शिक्षणसंस्था ही समाजापासून वेगळी नसून समाजाच्या विकासाचे केंद्र असली पाहिजे, अशी त्यांची भूमिका त्यांच्या कार्यातून जाणवत राहिली.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची धार्मिक आणि सांस्कृतिक जाणीव. धर्म त्यांच्या दृष्टीने केवळ कर्मकांड नव्हता; तो माणसाला माणसाशी जोडणारा, सदाचार शिकविणारा आणि समाजाप्रती कर्तव्याची जाणीव करून देणारा जीवनमार्ग होता. अध्यात्म, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल त्यांच्या विचारांत होता. म्हणूनच त्यांच्यासाठी धर्म म्हणजे मानवतेची सेवा आणि समाजहिताची भावना यांना बळ देणारी शक्ती होती.

त्यांचे विचार व्यापक आणि सर्वसमावेशक होते. बदलत्या काळाची पावले ओळखून शिक्षणानेही बदलले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. परंपरेतील चांगले जपतानाच नव्या विचारांचे स्वागत करण्याची त्यांची वृत्ती होती. म्हणूनच ते केवळ एका पिढीचे शिक्षक नव्हते; ते अनेक पिढ्यांना जोडणारे विचारवंत होते आणि यातूनच खऱ्या अर्थाने समाजासाठी क्रांतिसूर्य ठरले.

आज मन भूतकाळात परतत आहे. माझ्याशी बोलताना सर नेहमी म्हणायचे, “अरे, तुम्ही आपली माणसं...” — या एका शब्दात किती आपुलकी सामावलेली असायची, हे शब्दांत सांगणे कठीण आहे. ‘आपली माणसं’ हा उल्लेख ऐकला की वाटायचे, आपण त्यांच्यासाठी केवळ एक शिक्षक किंवा एक कर्मचारी नाही, तर त्यांच्या स्वतःच्या घरातलेच कोणीतरी आहोत. त्यांच्या या हाकेत अधिकारही होता आणि प्रेमही होते; शिस्तही होती आणि माया देखील. आजही कानात तो आवाज घुमतो — “आपली माणसं” — आणि मन गलबलून येते.

सरांचे आणि आमचे नाते कधीच संस्था-कर्मचारी असे औपचारिक नव्हते. ते नाते घरातल्या वडीलधाऱ्या माणसासारखे होते. वडील जसे धाकात ठेवतात, पण त्याच धाकाआड मायेचा झरा वाहत असतो, तसेच सरांचे होते. त्यांचा शब्द म्हणजे आज्ञा नव्हती, ती वडीलकीची जबाबदारी होती. त्यांनी रागावले तरी त्यात सुधारण्याची तळमळ असायची, आणि त्यांनी कौतुक केले तरी त्यात अभिमानाची झळाळी असायची. आम्ही त्यांच्याकडे कधी ‘साहेब’ म्हणून पाहिलेच नाही; आम्ही त्यांच्याकडे नेहमी घरातील ज्येष्ठ, आधारवड, आणि हक्काचे वडील म्हणूनच पाहिले. त्यांच्यासमोर उभे राहताना जो आदर वाटायचा, तो अधिकाराच्या भीतीतून नव्हे, तर मनापासून वाटणाऱ्या प्रेमातून आणि कृतज्ञतेतून यायचा.

आज त्यांच्या निधनाची बातमी मनाला स्वीकारणे कठीण जाते. त्यांच्या आवाजातील आपुलकी, बोलण्यातला आत्मविश्वास, मार्गदर्शन करतानाची कळकळ आणि एखाद्या विद्यार्थ्याच्या भवितव्याचा विचार करताना त्यांच्या डोळ्यांत दिसणारी चमक—या सगळ्या आठवणी आता मनात कायमच्या घर करून राहतील. एखादी व्यक्ती समोर नसते, पण तिचे विचार सतत आपल्या सोबत असतात; कदाचित त्यालाच खरे अमरत्व म्हणावे. आज मी वाहिलेली ही शब्दांजली म्हणजे केवळ दुःखाची अभिव्यक्ती नाही. ती एका ऋणाची जाणीव आहे. ज्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला, “पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा” असे ज्यांच्याकडे पाहून वाटायचे अशा व्यक्तिमत्त्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा क्षण आहे.

आज सर आपल्यात नाहीत; पण त्यांनी पेटवलेला ज्ञानाचा दीप विझलेला नाही. सूर्य मावळला, पण त्याने दिलेला प्रकाश आकाशात दरवळत राहतो, तसेच सरांचे विचार शिक्षकांच्या कार्यातून, विद्यार्थ्यांच्या यशातून, गरजू मुलांच्या शिक्षणातून आणि समाजाच्या प्रगतीतून तेवत राहतील. त्यांनी उभ्या केलेल्या संस्था, दिलेले मार्गदर्शन आणि घडविलेली माणसे हीच त्यांच्या कार्याची खरी स्मारके ठरतील.

काळ पुढे जात राहील. पिढ्या बदलतील. नवीन शैक्षणिक धोरणे येतील, नवीन तंत्रज्ञान येईल; पण ‘शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे साधन आहे’ हा विचार कधीही जुना होणार नाही. तो विचार सरांच्या स्मृतीसोबत पुढे नेणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

काही व्यक्तींच्या जाण्याने घर रिकामे होते; काहींच्या जाण्याने संस्था पोरकी होते; पण काही व्यक्तिमत्त्वांच्या जाण्याने संपूर्ण समाजाच्या मनात एक मोठी पोकळी निर्माण होते. स्व. भास्कररराव रासकर सर हे अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते.

आज त्यांच्या स्मृतीसमोर नतमस्तक होताना मनात एकच भावना उमटते—

“माणूस गेला, पण माणुसकीचा वारसा मागे ठेवून गेला;

शिक्षक गेला, पण ज्ञानाची ज्योत पेटवून गेला;

सूर्य विरून गेला, पण माझ्यासारख्या असंख्य ज्योती पेटवून गेला;

सर गेले, पण हजारो मनांत आपली छाया ठेवून गेले.”

स्व. भास्कररराव रासकर सरांना विनम्र अभिवादन!

त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली!

ॐ शांती!

शब्दांकन : श्रीमती विजया गदादे (शिक्षिका)

संत निळोबाराय विद्यालय, पिंपळनेर

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top