देवीभोयरेत बिबट्यासह रानडुकरांचा धुमाकूळ; शेळीचा फडशा पाडल्याने ग्रामस्थ दहशतीखाली

0




महाराष्ट्र दर्शन न्युज | देवीभोयरे | प्रतिनिधी - सागर आतकर

           देवीभोयरे आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या, रानडुक्कर आणि तरस या वन्यजीवांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वन्यजीवांच्या या वाढत्या वावरामुळे शेतकरी, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे प्रचंड वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांचे पशुधन आणि शेती धोक्यात आली आहे.

​१३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास श्री. बाबुराव तबाजी मुळे यांच्या गोठ्यात बांधलेल्या शेळीवर बिबट्याने अचानक हल्ला करून तिला ठार केले. या हल्ल्यात शेळीचा पूर्ण फडशा पडल्याने पशुपालक मुळे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेचा धक्का ओसरतो न ओसरतो तोच, १४ ऑगस्ट २०२६ रोजी पुन्हा याच परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांच्या दहशतीत आणखीनच भर पडली आहे.

​पिकांचे नुकसान अन् आवागमन धोक्यात

​केवळ बिबट्याच नव्हे, तर रानडुक्कर आणि तरस या प्राण्यांचाही परिसरात मोठा वावर वाढला आहे. रानडुकरांच्या टोळ्या उसाच्या फडात आणि शेतशिवारात घुसून उभ्या पिकांची नासधूस करत आहेत. रात्रीच्या वेळी तरस आणि बिबट्याच्या भीतीने घराबाहेर पडणेही धोकादायक ठरत असून शेतकऱ्यांना दिवसाढवळ्याही शेतात जाणे अशक्य झाले आहे.

“वनविभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पिंजरा लावावा आणि बिबट्याला जेरबंद करावे. तसेच रानडुक्कर व तरस यांच्या उपद्रवापासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी नियमित गस्त वाढवावी. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन त्यांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी.”- सामाजिक कार्यकर्ते बाबुराव मुळे


​वनविभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन वन्यजीवांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top