"अण्णांचे वय ९० वर्षे, उपोषणाची वेळ येऊ देऊ नका!" – आमदार काशिनाथ दातेंची विधानसभेत शासनाला भावनिक साद

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर:

माहिती अधिकार कायद्यातील (RTI) प्रस्तावित सुधारणांच्या संदर्भात ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांनी येत्या ५ जुलैपासून पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे. अण्णांचे वाढते वय आणि आरोग्य पाहता, शासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा आणि अण्णांवर उपोषणाची वेळ येऊ देऊ नये, अशी आग्रही आणि भावनिक मागणी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी विधानसभेत केली आहे. सध्या सुरू असलेल्या राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी हा अत्यंत संवेदनशील मुद्दा उपस्थित केला.

पावसाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा

अधिवेशनादरम्यान औचित्याच्या मुद्यावर बोलताना आमदार काशिनाथ दाते यांनी अण्णा हजारे यांच्या प्रस्तावित आंदोलनाचा विषय सभागृहासमोर मांडला. ते म्हणाले की, "माझ्या २२४ पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात पद्मभूषण अण्णासाहेब हजारे आणि पद्मश्री पोपटराव पवार यांसारखे दोन थोर समाजसेवक राहतात, ज्यांचा देशाला अभिमान आहे. अण्णांनी माहिती अधिकार कायद्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला आहे. मात्र, आज अण्णांचे वय ९० वर्षे असून या वयात त्यांना उपोषणाचा शारीरिक त्रास सहन करणे अत्यंत कठीण आहे."

"पारनेर-नगर मतदारसंघातील जनतेच्या वतीने मी शासनाला विनंती करतो की, अण्णांवर उपोषण करण्याची वेळ येऊ नये, यासाठी तातडीने सकारात्मक संवाद साधून मार्ग काढावा."

— आमदार काशिनाथ दाते (विधानसभा)

सकारात्मक संवादाची गरज; आमदार दातेंच सभागृहात लक्षवेधी भाषण

आमदार दाते यांनी अण्णासाहेब हजारे यांच्याविषयी व्यक्त केलेली आत्मीयता आणि त्यांच्या आरोग्याबाबत दाखवलेली चिंता यामुळे संपूर्ण सभागृहाचे लक्ष या विषयाकडे वेधले गेले. माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कटिबद्ध असलेल्या अण्णांना उपोषणासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागू नये, हीच संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे. मतदारसंघातील ज्येष्ठ समाजसेवकांचा सन्मान राखत, त्यांच्या आंदोलनामागील विषयावर शासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी स्पष्ट अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आमदार दातेंच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा

माहिती अधिकार कायद्यात बदल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी ५ जुलैपासून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ५ जुलै अगदी जवळ आली असल्याने आता शासनाकडून काय पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. दरम्यान, आपल्या मतदारसंघातील ज्येष्ठ नेत्याच्या आरोग्यासाठी आणि सन्मानासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी विधानसभेत घेतलेल्या या संवेदनशील भूमिकेचे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य जनतेकडूनही मोठे कौतुक होत असून, सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top