चक्रीवादळग्रस्तांसाठी शासकीय मदतीच्या वाटपाला गती द्या – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

0

अलिबाग,जि.रायगड, दि. 14 :- जिल्ह्यात दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे मुरुड, श्रीवर्धन, अलिबाग तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झालेली आहे. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे.  या नुकसानग्रस्तांचे जनजीवन सुरळीत करण्यासाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या मदत निधीचे वाटप गतीने करावे, असे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले. 

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज पाहणी केली, नागाव, काशिद येथील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार माणिक जगताप, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी  दिलीप हळदे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आदी उपस्थित होते.
वेधशाळेने चक्रीवादळाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिलेल्या आदेशानुसार प्रशासन सज्ज होते.  याआधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खा.शरद पवार व अन्य मंत्री महोदयांनी नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली आहे. यामध्ये खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते.  नुकसानग्रस्तांसाठी आधी जे मदतीचे निकष होते त्यात शासनाने बदल करुन शासनाकडून वाढीव मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांच्या घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी  1 लाख 50 हजार व कपडे, भांडी यासाठी 10 हजार असे एकूण 1 लाख 60 हजार रुपयांची तातडीची मदत दिली जाणार आहे.  याआधी आपत्तीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना हेक्टरी 18 हजार रुपये मदत दिली जात होती. आता त्यामध्ये शासनाने वाढ करुन हेक्टरी 50 हजार रुपये केले आहेत, असेही महसूलमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
कोकणातील शेतीचे मोजमाप हे गुठ्यांमध्ये होत असल्यामुळे प्रति गुंठ्यासाठी अधिकाधिक मदत कशी देता येईल, यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगून नुकसानग्रस्तांना  मदतीचे वाटप गतीने करण्याची  शासन काळजी घेत आहे. लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी ग्वाहीदेखील यावेळी महसूलमंत्री श्री. थोरात यांनी दिली.  
रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबद्दल जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी आग्रहाने भूमिका केंद्र शासनाकडे मांडून अधिक निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील. चक्रीवादळात ज्यांच्या घराचे, फळबागांचे, मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी ही केवळ मदत नसून हे माझे कर्तव्य आहे, या भावनेतून शासनाकडून दिली जाणारी मदत तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविली जाईल, असेही महसूलमंत्री यावेळी म्हणाले.
यावेळी नागाव ग्रामपंचायतीमधील काही नुकसानग्रस्त नागरिकांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आदी मान्यवरांच्या हस्ते नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, आमदार महेंद्र दळवी , माजी आमदार माणिकराव जगताप यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top