पारनेर. दि. 13
ग्रामीण भागात लॉकडाऊनमुळे महिलांची रोजगाराची साधणे बंद झाली असून महिला बचत गटांचे तीन महिन्याचा हप्ता सरकारने भरुन बचत गटांना सहकार्य करण्याची मागणी महिला बचत गटाच्या तालुका संघटक व निघोज ग्रामपंचायत सदस्या सौ. सुधामतीताई कवाद यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रती त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार निलेश लंके तसेच संबधीत अधिकाऱ्यांना पाठवल्या आहेत.
निवेदनात कवाद यांनी म्हटले आहे. पारनेर तालुक्यातील हजारो महिला बचत गटांच्या माध्यमातून कार्यरत आहेत. शासकीय योजनांचा लाभ घेउन कमी व्याजाने त्यांनी कर्ज घेऊन ग्रामविकासात्मक कार्यात त्यांनी सातत्याने सरकारला मदत केली आहे. त्याचबरोबर आपल्या कुटूंबाची उपजीविका नोकरी किंवा व्यवसाय माध्यमातून होण्यासाठी या महिला बचत गटाच्या सदस्या नेहमीच सतर्क राहील्या आहेत. पारनेर तालुक्यात बचत गटाची संख्या मोठी आहे. त्यामाध्यमातून हजारो कुटुंबांना या बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळत असते ही समाधानाची बाब आहे. कुटुंब चालवण्यासाठी महिला सदस्यांचे योगदान मोठे आहे हे सर्वांनाच मान्य करावे लागेल. गेली तीन महिने कोरोना पार्श्वभूमीवर सर्व देश लॉकडाउन होता. याचा सर्वाधिक फटका महिलांना मोठय़ा प्रमाणात बसला आहे. महिला या रोजंदारीसाठी शेतीच्या कामासांठी जातात. दूध डेअरी उद्योगसमूहांमध्ये सुद्धा महिला कामगारांची संख्या फार मोठी आहे. बहुतांश महिला या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून समाजात कार्यरत आहेत. असे असताना व त्यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून पाच पंचवीस हजार रूपयांचे कर्ज घेतले आहे. मात्र तीन महिन्यांत लॉकडाऊनमुळे रोजगार असो की व्यवसाय न करता या महिला तीन महिने घरातच बसून होत्या. अशातच महिला बचत गटाच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाचे हप्ते व त्यावरील व्याज कसे काय भरणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी राज्य किंवा केंद्र सरकारने हे तीन महिन्याचे हप्ते माफ करुन संबधीत रकमेची त्यांच्या कर्जातून वजावट करुन सरकारने ते हप्ते स्वत संबधीत बॅंकेमध्ये भरुन या महिला बचत गटाच्या सदस्यांना मदत करावी अशी मागणी निवेदनात कवाद यांनी केली आहे.
याबाबत आठ ते पंधरा दिवसात कार्यवाही न झाल्यास आम्ही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करुण हजारे यांच्या माध्यमातून हा प्रश्न सरकारी दरबारी मांडणार आहोत - सुधामतीताई कवाद
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद