कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी करण्याचा प्रयत्न करण्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

0
सोलापूर, दि. 11 : सोलापूर शहरातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी करण्याचा प्रयत्न करा, अशा सूचना जिल्हा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिल्या.
सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री श्री.भरणे यांनी या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपायुक्त बापू बांगर, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.भरणे यांनी सांगितले की, सोलापूर शहरातील मृत्यूदर कमी करण्यासाठी प्राधान्याने काम करा. यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि उपचार यातील कालावधी कसा कमी करता येईल यावर भर द्या. राज्याच्या टास्क फोर्समधील डॉ.दिलीप कदम यांनी नुकतीच सोलापूर शहराला भेट दिली आहे. त्यांनी सोलापुरातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्याबाबत काही सूचना दिल्या आहेत. त्या सूचनावर अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर राज्याच्या पथकातील विशेष तज्ञ डॉक्टर बोरसे यांना संपर्क करून मृत्यूदर कमी करण्याबाबत काय उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा करा. इतर जिल्ह्यात काय उपचार सुरू आहेत. तेथे काही नाविन्यपूर्ण उपाययोजना राबविल्या जात आहेत का, याची माहिती घ्या. 
बैठकीत मद्यविक्री सुरू करण्याबाबत चर्चा झाली. यावर जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांनी एकत्रित विचार करून त्याबाबत निर्णय घ्यावा, असे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.  कर्ज वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या कंपन्या आणि वित्तीय संस्थाविरुद्ध कारवाई करावी, अशा सूचनाही पालकमंत्री भरणे यांनी दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top