पारनेर : मिशन ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदी आदेशाचे विविध गावांतील नागरिकांकडून सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने तहसीलदार ज्योती देवरे यांनी आज (गुरूवारी) एक दिवसासाठी रुग्णालये,औषध दुकाने वगळता तालुक्यातील इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले. तहसीलदार देवरे यांनी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास बंदचे आदेश दिल्यानंतर पारनेरसह तालुक्यातील विविध बाजारपेठांमधील व्यवहार, भाजी, फळे बाजार तातडीने बंद करण्यात आले.
राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदी आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी पोलीसांच्या फौजफाट्यासह सकाळी सात वाजल्यापासून तालुक्यातील विविध गावांना भेटी देण्यास सुरुवात केली.
तालुक्याच्या ग्रामीण भागात करोना संसर्गाचा फैलाव वेगाने होत आहे. नागरिकांंनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. प्रशासनाच्या अवाहनाला व संचारबंदी आदेशाला न जुमानता नागरिक मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठा, भाजीबाजार, फळबाजारात गर्दी करीत आहे. याठिकाणी करोना प्रतिबंधक उपाययोजनांचे सर्रास उल्लंघन होत आहे.
तहसीलदार देवरे व पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी आज गुरूवारी सकाळी तालुक्यातील सुपे, टाकळी ढोकेश्वर, भाळवणी, निघोज, अळकुटी या प्रमुख गावांसह विविध गावांना भेटी दिल्या. यावेळी नागरिक गावाच्या मुख्य चौकासह सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीत असल्याचे निदर्शनास आले. पारनेर शहरातही संचारबंदी आदेशाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तहसीलदार ज्योती देवरे यांनी रुग्णालये, औषधाची दुकाने वगळता इतर सर्व व्यवसाय एक दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर मात्र तालुक्यातील सर्व प्रमुख बाजारपेठांसह विविध गावांमधील व्यवहार तातडीने बंद झाले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद