जागतिक चिमणी दिन / चिऊताईच्या संवर्धनासाठी मानवी इच्छाशक्तीची गरज

0

तसेतर निसर्गामध्ये अनेक पशुपक्षी, प्राणी आहेत. मात्र सर्वसामान्य लोकांच्या अगदी जवळच असलेला, बालगोपाळांपासून ते मोठ्या अबालवृद्धांपर्यंत प्रत्येक जण ज्याचे बडबड गीत गातात असा पक्षी म्हणजे चिमणी, म्हणजेच आपली चिऊताई. जिच्या संवर्धनासाठी आज "चिमणी दिन" साजरा केला जात आहे. दरवर्षी २० मार्च हा संपूर्ण जगात चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो.



         का बरे हा चिमणी दिन साजरा करायची वेळ मानवावर आली ? तर त्यालाही मानवच जबाबदार आहे. आज आपण पाहतो चिऊताई भल्या पहाटे अंगणात दाना टिपण्यासाठी येते. मात्र आता तिची संख्या खूप कमी झाली आहे. शहरात तर या चिमण्या लुप्त होत चालल्या आहेत. मानवाच्या आधुनिकतेची ती पण शिकार होत आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. आजवर अनेक कवीं, लेखकांच्या लेखनाचा विषय चिऊताई असायची. मात्र आज तीच चिऊताई जगभराचा विषय झाली असून तिच्या रोडावलेल्या संख्येमुळे.

       अनादिकालापासून चिमणी ही मानवाच्या अगदी जवळ होती व आहे. तिचे प्रमुख खाद्य कीटक, धान्य, शिजवलेले अन्न असे आहे. ग्रामीण भागातील प्रामुख्याने जुन्या वाड्यांच्या भिंतीत, कपारीत, घराचे छत आदित ती आपले घरते करते, तसेच अतिशय डेरेदार चिंचेचे झाड, बाभळीचे झाड यावरही ती वास्तव्य करते. मात्र अलीकडे शहराप्रमाणेच खेड्या गावात ही आता सिमेंटची घरे होऊ लागल्यामुळे त्यांचा निवारा कमी होऊ लागला आहे. आधुनिकीकरणासाठी मोबाईल टावरची संख्या वाढल्याने त्यांच्या तरंगलहरीमुळे इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक रेन्जच्या संपर्कामुळे त्याचा परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात चिमण्या मृत्यू पावत आहेत, असे एका संशोधनात आढळले आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीचा परिणामही त्यांच्या वास्तव्यावर होत आहे. शेतातील पिकांवर मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशक वापरल्यामुळे कीटकांना खाल्यानंतर चिमणीच्या जीवनावर त्याचा परिणाम होत आहे. अशा एक ना अनेक कारणांमुळे आज सर्वसामान्यांच्या जवळ असलेली चिमणी दुर्मिळ होत चालली आहे.

      मात्र तिच्या संवर्धनासाठी आता जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. २० मार्च २०१० पासून जागतिक चिमणी दिन साजरा होऊ लागला आहे. लोकांमध्ये चिमणी बद्दल जनजागृती घडवून आणून त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्यासाठी अनेक संस्था, व्यक्ती पुढे येऊ लागले आहे. त्यासाठी घराघरातून, शाळांमधून तिच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला गेला पाहिजे. तिच्या वास्तव्यासाठी कृत्रिम घरे, दानापाण्याची सोय तसेच तिच्याबद्दल समाज माध्यमांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. चिमणी हा मानवासाठी अतिशय महत्त्वाचा पक्षी असून वेळीच तिच्या संवर्धनासाठी मानवाने स्वत: पुढाकार घेतला पाहिजे. 


 सृष्टीमित्र परिवाराचे

 "मुठभर दाणा - घोटभर पाणी"

आपल्या पर्यावरणातील पशुपक्षी, प्राणी, वनस्पती आदीचे संरक्षण व संवर्धन झाले पाहिजे, यासाठी पारनेर येथील सृष्टीमित्र परिवार प्रयत्नशील आहे. सृष्टीमित्र परिवाराने २०१५ पासून "मुठभर दाणा - घोटभर पाणी" हा उपक्रम सुरू केला आहे. फेब्रुवारी महिना संपला की उन्हाळ्याची चाहूल लागते. त्यामुळे पशुपक्ष्यांसाठी दाणापाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. म्हणून सृष्टीमित्र परिवाराने २०१५ पासून तालुक्यातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये पशुपक्ष्यांच्या संवर्धनात विषयी जनजागृती केली आहे. या अंतर्गत शाळांमधील विद्यार्थ्यांना आपल्या घराच्या अंगणात, टेरेसवर त्याच प्रमाणे घरासमोरील झाडांवर पक्ष्यांसाठी दाणापाणी ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. तसेच अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना जलपात्र वाटप करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन पक्ष्यांसाठी दाना पाण्याची व्यवस्था करतात. यातूनच भविष्यामध्ये चिमण्यांची संख्या वाढण्यास हातभार लागेल.

श्री. लतिफ बाल राजे

अध्यक्ष - सृष्टीमित्र परिवार, पारनेर

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top