शिरूर/ प्रतिनिधी : किरण चौधरी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज शिरूर तालुका संघटकपदी अविनाश सुरेश घोगरे यांची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी ते मनसेचे शहराध्यक्ष म्हणून काम पाहात होते.
मनसेच्या शिरूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे झालेल्या बैठकीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर यांनी नियुक्तीचे पत्र अविनाश घोगरे यांना दिले. पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष हेमंत बत्ते, तालुकाध्यक्ष (शिरूर - हवेली) तेजस यादव, तालुकाध्यक्ष (शिरूर - आंबेगाव) नानासाहेब लांडे, जिल्हा उपाध्यक्ष किरण गव्हाणे, मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल खेडकर, शिरूर शहर सचिव रवीराज लेंडे आदी यावेळी उपस्थित होते.
मनसेच्या तालुका संघटकपदी नियुक्ती झालेले अविनाश घोगरे यांनी यापूर्वी पक्षाचे शिरूर शहराध्यक्ष, मनविसेचे शहराध्यक्ष, विभाग अध्यक्ष व शाखा अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. या पदांच्या माध्यमातून शिरूर मध्ये नैसर्गिक ओढे नाले, जास्त वीज बील असे अनेक विषयांवर घोगरे यांनी आंदोलन व उपोषण, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, युवकांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी आंदोलनांच्या माध्यमातून आवाज उठविला आहे. शिरूर शहर व परिसरातील विविध नागरी समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या घोगरे यांनी विविध प्रकारच्या नागरी समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेत पाठपुरावा केला आहे. शहरातील हुडको कॉलनी (संभाजी नगर) येथील जय भवानी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले अविनाश घोगरे हुडको वासिय कृती समितीचे सचिव आहेत.
मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना अभिप्रेत पक्ष संघटना बांधणीसाठी कटीबद्ध असून, शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावातील कल्पक, होतकरू व कार्यक्षम तरूणांना राज साहेबांचे सामाजिक परिवर्तनाचे व नवनिर्माणाचे विचार पटवून देताना त्यांना पक्षाच्या झेंड्याखाली संघटीत करण्यासाठी या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे अविनाश घोगरे यांनी सांगितले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद