शिर्डी,दि. १७ : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत राज्यातील शहर, गाव, पाडे-वस्त्या व तांडे येथील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी, कोर्माबीड आजार असल्यास उपचार आणि आरोग्य विभागातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या पथकाकडून प्रत्येक नागरिकास व्यक्तीश: भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत राहाता तालुक्यात नागरिकांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात झाली आहे.
कोविड आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबर 2020 पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम राज्यात राबविण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. मोहीमेची पहिली फेरी 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये आणि दुसरी फेरी 14 ते 24 ऑक्टोबर या कालावधीमध्ये पार पडणार आहे. पहिल्या फेरीचा कालावधी 15 दिवसांचा असून दुसऱ्या फेरीचा कालावधी 10 दिवसांचा आहे.
या मोहिमेमध्ये गृहभेटीसाठी त्रीसदस्यीय पथक नेमण्यात आले आहे. पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी किंवा आशा वर्कर आणि दोन स्थानिक स्वयंसेवक (एक पुरुष व एक स्त्री) यांचा समावेश आहे. राहाता तालुक्यात जवळपास तीनशे कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या शंभर पथकांची स्थापना करण्यात आली असून या पथकामार्फत तालुक्यातील ग्रामपंचयातस्तरावर नागरिकांच्या आरेाग्य तपासणीस सुरुवात झाली आहे. पथकाला थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमिटर व इतर साहित्याचा पुरवठा करण्यात आला असून, त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक 5 ते 10 पथकांसाठी एक डॉक्टर नियुक्त केले असून त्यांच्यामार्फत गरजेनुसार वैद्यकीय उपचार व संदर्भ सेवा देण्यात येणार आहे. दररोज पन्नास घरांतील सदस्यांची तपासणी या पथकाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के यांनी दिली.
ग्रामपंचायत स्तरावर संबधित गावाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामसेवक, स्वयंसेवक यांच्याकडून गांवकरी आणि तपासणी पथकामध्ये ताळमेळ ठेवण्यात येत असून यासंबधी जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी दिली. या मोहिमेद्वारे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असल्याने त्यांनी आपला सहभाग नोंदवून पथकाला सहकार्य करण्याचे आवाहन तालुका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद