पारनेर/प्रतिनिधी : पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक व वनकुटेचे सरपंच अँड. राहुल झावरे यांच्याविरोधात शुक्रवारी (दि. १०) पारनेर पोलिस ठाण्यात मिनिनाथ सूर्यभान बर्डे यांच्या तक्रारीवरून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याबाबत अॅड. झावरे म्हणाले की, हा गुन्हा राजकीय द्वेषापोटी दाखल झाला असून, गुन्हा दाखल होताना तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे तेथे येऊन गेल्या.
तहसीलदार देवरे व सुजित झावरे यांची एक बैठक पारनेरमध्ये झाली. त्यांनी नियोजन करून हा गुन्हा दाखल केला. मी लोकायुक्तांकडे तहसीलदार देवरे यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात तक्रार केल्यामुळे देवरे, सुजित झावरे व बाळासाहेब माळी यांनी माझ्यावर हा खोटा गुन्हा दाखल केला, असा प्रत्यारोप अँड. झावरे यांनी केला. या गुन्ह्यामुळे पारनेरमधील तहसीलदार विरुद्ध आमदार लंके समर्थक हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
पारनेर पोलिस ठाण्यात दाखल
फिर्यादीत नमूद आहे की तास येथील येडूमाता मंदिर सभामंडपासाठी निधी मिळावा अशी मागणी फिर्यादी बड़े यांनी वनकुटेचे सरपंच अँड. राहुल झावरे यांच्याकडे केली होती. त्यावर झावरे त्यांना म्हणाले, की मी दशक्रिया विधीसाठी येणार आहे. तू तिथे ये बड़े व गावातील प्रल्हाद रामचंद्र पवार व नाथा गणपत बर्डे असे तिघेजण तेथे गेले. त्यानंतर तेथे सरपंच झावरे आले. दशक्रियेचा कार्यक्रम झाल्यावर तेथून लोक निघून गेले. त्यावेळी सरपंच झावरे यांना सभामंडपाविषयी बोललो असता, त्यांनी जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केली.
याबाबत अॅड. झावरे यांना विचारणा केली असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळले. आपण आयुष्यात कुणाला शिविगाळ केलेली नाही. जातीवाचक शिविगाळ व मारहाणीचा प्रश्नच निर्माण होत नाही. फिर्यादी आपल्या गावातील आहेत. गुन्हा दाखल करताना तहसीलदार ज्योती देवरे, भाजप नेते सुजित झावरे हे एकत्र होते. आपल्याविरोधातील हे राजकीय षडयंत्र असून, तहसीलदारांविरोधात आपण भ्रष्टाचाराची तक्रार थेट लोकायुक्तांकडे केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे अँड. झावरे यांनी सांगितले. दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यामुळे पारनेरचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकारामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप वाढण्याची शक्यता निर्माण झालो आहे.
या गुन्ह्यात काहीही तथ्य नाही. राजकीय द्वेषापोटी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करताना तहसीलदार देवरे, भाजप नेते सुजित झावरे व फिर्यादी एकत्र होते. गुन्हा दाखल करताना तहसीलदार येण्याचे काय कारण? त्यांनी त्यांचे काम तहसील कार्यालयात करावे. त्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करताना स्वतः आल्या. फिर्यादीजवळ बसल्या. फिर्यादी गावातीलच असल्याने त्यांना मी ओळखतो. मात्र फिर्यादी व माझी आज कोठेच गाठभेट झालेली नाही. त्यामुळे हा गुन्हा केवळ राजकीय सूडबुद्धीचा प्रकार आहे. -अॅड. राहुल झावरे सरपंच वनकुटेसचिव : निलेश लंके प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य
अॅड. राहुल झावरे
सरपंच वनकुटे
सचिव : निलेश लंके प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद