पारनेर: आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे भक्तांसाठी खुले करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. आज राज्यभरातील अनेक मंदिरांची दारं उघडली असून भक्तांनी देवदर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे.
मात्र पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा मंदिर बंद असल्याने भाविकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. निघोज गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याच्या अहवालानुसार जिल्हाधिकारी यांनी धार्मिक स्थळे व व्यावसायिकांना दि. १४ पर्यंत बंदच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, नवरात्रोत्सवामध्ये मळगंगा मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात यावे अशी जोरदार मागणी भाविकांमधून सुरू आहे.
आज नवरात्र उत्सवाचा पहिलं दिवस असून भाविक मंदिराबाहेरून मळगंगा देवीचे दर्शन घेऊन माघारी परतत आहेत.
निघोज व परिसराच्या लोकसंख्येचा विचार करता प्रत्यक्षात कोरोना रुग्णांची संख्या अत्यल्प असताना प्रशासनाने घातलेले निर्बंध हे अन्यायकारक असल्याची भावना नागरीकांमधून व्यक्त होत आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद