बुलडाणा, (जिमाका) : संग्रामपूर शहर विकासाला मोठा वाव आहे. शहराच्या शाश्वत विकासासाठी मोठे काम करावयाचे आहे. शहरात रस्ते, नाल्या, शाळा, आरोग्याची सुविधा, घरकुल तसेच पाणी पुरवठा याबाबत समीक्षा करून विकास करावा लागणार आहे. त्यासाठी संग्रामपूर शहर विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करावी, अशा सूचना जलसंपदा, महिला व बालविकास, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज संग्रामपूर येथे दिल्या. संग्रामपूर नगर पंचायत सभागृहात शहर विकासासाठी विविध विषयांवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यमंत्री श्री. कडू बोलत होते.
नगर पंचायत येथील उर्दू शाळा मराठी शाळेच्या इमारतीत प्राधान्याने स्थलांतरित करण्याच्या सूचना देत राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले, शाळा स्थलांतर तातडीने करावे. जेणेकरून शिक्षणाची सुविधा उपलब्ध होईल. तसेच शहरात पिण्याचे पाणी आठवड्यातुन १ दिवशी मिळत असल्याने २४ तासांवर कसे देता येईल याबाबत नियोजन करावे. शहरातील रस्त्यांची कामे करावी. घरकुल योजना प्रभावी पणे राबवून गरजू लाभार्थींना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. तसेच शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. याप्रसंगी जिल्हास्तरीय यंत्रणांचे अधिकारी, नगर पंचायत सर्व विभागाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थीत होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद