पारनेर तालुक्यातील निघोज येथे कन्हैया केसरी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले असून या निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात राज्यातील नामांकित पैलवान सहभागी होणार असून लाखो रूपयांच्या बक्षीसाची खैरात होणार असल्याची माहिती कुस्ती स्पर्धा आयोजक शिवराय केसरी विजेते नामांकित पैलवान अमोल लंके यांनी दिली.
कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मच्छिंद्र लंके यांच्या वाढदिवसानिमित्त कन्हैया केसरी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कुस्त्यांना बुधवार दि.२७ रोजी दुपारी ४.३० वाजता सुरू होणाऱ्या या कुस्ती स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विजेत्या पहिलवानांना दहा लाख रुपयांची रोख बक्षिसे व कन्हैया केसरी किताब देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण पद्मश्री पोपटराव पवार व आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यामध्ये प्रथम क्रमांकांची कुस्ती पैलवान रोहित पटेल यांचा पठ्या ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय केसरी विरूद्ध पैलवान जगवाल सिंग यांचा पठ्या भारत केसरी पंजाब पैलवान अरविंद सिंग यांची होणार असून तीन लाख रुपयांचे बक्षीस असून गणेश उद्योग समूहाचे सर्वेसर्वा विकास आढाव हे या कुस्तीचे प्रायोजक आहेत. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान हरिश्चंद्र बिराजदार यांचा पठ्ठा गोकुळ वस्ताद तालमीचा पैलवान व उपमहाराष्ट्र केसरी सागर बिराजदार विरुद्ध पैलवान पंकज हरपुडे व पैलवान महेश मोहोळ यांचा पठ्ठा मामासाहेब कुस्ती संकुलातील पैलवान अक्षय शिंदे यांची होणार असून दोन लाख रूपयांचे बक्षीस असून डि बी कंट्रक्शनचे संचालक सागर लाळगे हे या कुस्तीचे प्रायोजक आहेत.
तीसऱ्या क्रमांकाची कुस्ती १ लाख रुपयांची असून अमोल बुचुडे यांचा पठ्ठा रुस्तुम हिंद ॲकॅडमीचा पैलवान राष्ट्रीय खेळाडू सुदर्शन कोतकर विरुद्ध पैलवान अस्लम काज यांचा पठ्ठा शिवराय कुस्ती संकुलचा पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन महारुद्र काळे यांची होणार असून माळवडगावचे लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब चेडे या कुस्तीचे प्रायोजक आहेत.
याच मैदानात अनेक लहान मोठ्या कुस्त्या होणार असून चार लाख रूपयांची खैरात होणार असून एकंदरीत दहा लाखांपेक्षा जास्त रुपयांची बक्षिसे देत नामंकीत पैलवानांचा सन्मान करण्यात येणार आहे. कुस्ती निवेदक म्हणून युवराज केचे सोलापूरकर काम पहाणार आहेत.
हलगी वादक म्हणून जय बजरंग मित्रमंडळ अकलूज असून यासाठी विशेष सहकार्य पारनेर तालुका पत्रकार संघाचे राहणार असून या स्पर्धा पारनेर तालुक्यातील निघोज येथील शिरुर रोडनजीक असणाऱ्या नायरा पेट्रोल पंपाशेजारील मैदानावर होणार असून कुस्ती शौकीनांनी या कुस्ती स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद