पावसाळा म्हणजे समृद्ध जीवन. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपासून तर आयटीत काम करणाऱ्या इंजिनिअरपर्यंत सगळ्यांना हवाहवासा वाटणारा पाऊस. उन्हाळ्याच्या झळा सोसून अगदी नकोस झालं की पाऊस येतो आणि नवचैतन्य निर्माण करतो. पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ असते, वातावरण प्रसन्न राहते. त्यामुळे हे चार महिने आपल्यासाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाहीत. पण एखाद्या गोष्टीचे जितके फायदे, तसेच तोटेही असतात हे विसरता कामा नये. पावसाळ्यात जसे मन प्रसन्न, आनंदी राहते अगदी तसेच आपल्याला काही आजारांचा धोका देखील असतो. ज्या आतुरतेने आपण पावसाची वाट पाहतो तितकीच आपण आरोग्याची काळजी घेणे देखील आवश्यक आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल (Monsoon will arrive in Kerala) होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं (imd alert) वर्तवला आहे. आता पाऊस लवकरच राज्यात दाखल होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पावसाळ्यात काय काळजी घ्यावी, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आजार सुरुवातीला इतके जास्त गंभीर नसतात. परंतु आपले थोडेसे दुर्लक्ष व निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. या आजारांमध्ये मलेरिया, कॉलरा, टायफॉइड, चिकुनगुनिया आणि सर्दी आणि फ्लू यांचा समावेश आहे.
सर्दी खोकला :
आजार खूप सामान्य असून शरीरात जास्त काळ ओलावा राहिल्याने सर्दी-खोकल्याचे बॅक्टेरिया जन्माला येतात, ज्यामुळे सर्दी, ताप, खोकला यांसारखे आजार होण्याची शक्यता वाढते. हा आजार टाळण्यासाठी पावसात भिजणे टाळणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणाने ओले झाल्यास लगेच कपडे बदलून कोरडे कपडे घालने योग्य ठरेल.
मलेरिया :
ठिकठिकाणी पाणी साचून डास चावल्याने हा आजार होतो. हा एक संसर्गजन्य रोग आहे जो मादी ॲनोफिलीस डासाच्या चाव्यामुळे होतो आणि हा जगातील सर्वात घातक रोगांपैकी एक आहे. ताप आणि अंगदुखीने थरकाप ही लक्षणे मलेरियाची आहेत. यापासून वाचण्यासाठी चावण्यापासून स्वतःचे संरक्षण करणे. रात्री झोपताना मच्छरदाणी वापरणे, घराभोवती पाणी साचू न देणे, नाल्यांमध्ये डीडीटी फवारणी करणे अशा पद्धतीने आपण काळजी घेवु शकतो. मलेरियाची लक्षणे दिसू लागताच त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
कॉलरा :
पावसाळ्यात दूषित पाणी आणि अस्वच्छता हे या आजाराचे प्रमुख कारण आहे. आजूबाजूची घाण हे कॉलरा पसरण्याचे सर्वात मोठे कारण आहे. जुलाब व उलट्या , पोटात तीव्र वेदना, अस्वस्थता आणि जास्त तहान लागणे ही या आजाराची लक्षणे आहेत. हे टाळण्यासाठी परिसर स्वच्छ करण्याबरोबरच पाणी उकळून प्यावे. या आजारापासून बचाव करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लसीकरण.
टायफॉइड :
टायफॉइड हा पावसाळ्याच्या दिवसांतील सर्वात धोकादायक आजारांपैकी एक आहे. संक्रमित पाणी आणि अन्नामुळे हा आजार होतो. खूप दिवस ताप येणे हे त्याचे लक्षण आहे. बरे झाल्यानंतरही, या आजारामुळे होणारे संक्रमण रुग्णाच्या पित्ताशयात सुरूच राहते, जे जीवघेणे राहते. हा विषमज्वराचा संसर्गजन्य आजार असल्याने त्याने लोकांपासून दूर राहावे. आजार टाळण्यासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक आहे. या आजारापासून बचाव करण्यासाठी द्रवपदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
चिकुनगुनिया :
पावसाळ्यात सगळ्यात जास्त आजार डासांमुळे होतात. चिकनगुनिया हा एडिस इजिप्ती डासाच्या चाव्याव्दारे होतो. या विशिष्ट प्रकारच्या डासाच्या चावल्यानंतर 3 ते 7 दिवसांनी रुग्णाच्या शरीरात चिकनगुनियाची लक्षणे दिसू लागतात. ताप व सांधेदुखी, डोकेदुखी, स्नायू दुखणे, सांध्यांना सूज येणे, अंगावर पुरळ येणे ही या आजाराची लक्षणे आहेत.या सर्व आजारापासून बचाव करण्यासाठी बाहेर विकले जाणारे उघडे खाद्यपदार्थ टाळणे, हा प्रमुख मंत्र आहे. तसेच स्वच्छ पाणी प्या, भरपूर द्रवपदार्थ घ्या जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता भासू नये. लक्षणे दिसून येताच डॉक्टरांशी संपर्क साधा.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद