महाराष्ट्र दर्शन न्यूज / मुंबई
कोरोना काळात दारूचा खप मोठ्या प्रमाणावर झाला. मात्र कोरोनाची लाट जशी वाढू लागली तसा राज्य सरकारने सगळी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर काही दुकाने उघडण्यास परवानगी दिली गेली. त्या काळात दारूच्या दुकानावर भली मोठी गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची पायमल्ली होऊ लागली होती. त्यामुळे सरकारने महसूल बुडू नये, यासाठी दारूच्या होम डिलिव्हरीला (Liquor Home Delivery) परवानगी देण्यात आली. मात्र आता सरकार हळूहळू कोरोना काळात घेतलेले नियम बदलताना दिसत आहे.
आता घरपोच मद्य विक्रीचा हा निर्णय राज्य सरकार कडून मागे घेण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला याबाबत राज्य सरकार कडून आदेश देण्यात आल्याची माहिती मिळते आहे. यासंदर्भात राज्याच्या गृह विभागाने महाराष्ट्र उत्पादन शुल्क आयुक्तांना पत्र लिहून आता दारूची होम डिलिव्हरी होणार नाही, असे पत्र दिले आहे.
मे 2020 पासून घरपोच मद्य विक्रीचा निर्णय घेण्यात आला होता. परवानाधारक मद्यविक्रेत्यांना घरपोच मद्य विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. पुढील वर्षी २०२१ मध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने घरपोच मद्यविक्री होतच होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. सर्व सेवा पूर्वीप्रमाणे सुरळीत झाल्या आहेत. त्यामुळे आता घरपोच मद्यविक्रीचा निर्णय राज्य सरकारकडून मागे घेण्यात आल्याचे समजते आहे.
उत्पादन शुल्क विभागाचे सचिव वल्सा नायर सिंग म्हणतात की सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी लॉकडाऊन दरम्यान होम डिलिव्हरीची परवानगी होती. दारुची होम डिलिव्हरी करायची की नाही या सर्व बाबींचा विचार करून सरकार लवकरच अंतिम निर्णय घेईल, असेही ते म्हणाले. त्यामुळे आरामात घरबसल्या दारून ऑर्डर करुन एन्जॉय करणाऱ्यांना आता पुन्हा घराबाहेर पडून आपली सोय करावी लागणार आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद