Onion Crop Management : कांदा पिकासाठी करपा हा रोग मोठा घातक ठरतो. या रोगामुळे पिकाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जाते. प्रामुख्याने ढगाळ हवामान धुके आणि पावसामुळे या रोगाचा प्रादुर्भाव पिकावर होत असतो. अशा परिस्थितीत या रोगाच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अंगीकारणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. कांदा रोपवाटिकेमध्ये करपा रोग येऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या पाहिजे.
तज्ञ लोकांच्या मते, कांदा रोपवाटिकामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रोपे ही वाफ्यात तयार केली पाहिजेत. तसेच वाफ्यात पाणी साचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. याशिवाय कांदा बीयाण पेरण्यापूर्वी बियाण्यास ५० अंश सेल्सिअस तापमान असलेल्या पाण्यात वीस मिनिट बुडवून ठेवले पाहिजे. असे केल्यास कांदा रोपांवर हा रोग येणार नाही.
हा रोग होऊ नये यासाठी एकाच शेत जमिनीत कांदा पिकाची वारंवार लागवड करणे टाळावे. म्हणजेच पिकाची फेरपालट करण्याचा सल्ला जाणकार देतात. दोन ते तीन वर्षांनी पिकाची फेरपालट केल्यास हा रोग येण्याचा धोका कमी होऊन जातो. याशिवाय प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे शेतकरी बांधवांनी पुनर्लागवड करताना रोपे कार्बेन्डाझिम ०.१ टक्के एक ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात दहा ते पंधरा मिनिट बुडवून घ्यावीत व नंतर मुख्य शेतात रोपांची लागवड करावी.
तसेच जर या उपायोजना करूनही कांदा पिकावर करपा रोग आला तर शेतकरी बांधवांनी रोप लागवडीनंतर 40 ते 50 दिवसांनी रोग नियंत्रणासाठी फवारणी करावी. तज्ञ लोकांच्या मते हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी मॅन्कोझेब ०.३ टक्के ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम ०.१ टक्के १ ग्रॅम किंवा टेब्यूकोनॅझोल ०.१ टक्के किंवा हेक्झाकोनॅझोल १ मिली किंवा मेटीराम ५५ टक्के प्रती लिटर पाण्यात मिसळून दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी.
याशिवाय जाणकार लोकांनी क्लोरोथेरोनॉल ०.२५ टक्के २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून दहा दिवसाच्या अंतराने फवारणी करण्याचा सल्ला या ठिकाणी दिला आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद