निघोज प्रतिनिधी
निघोज येथील श्री मुलिकादेवी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन शनिवार दि. 7 रोजी सेलटॅक्स अधिकारी डॉ.गणेश पोटे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सहदेव आहेर होते. यावेळी सुनिल पठारे, दादासाहेब पठारे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य मनोहर एरंडे, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा.आनंद पाटेकर व त्यांचे सर्व सदस्य, याचबरोबर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमापुर्वी डॉ.गणेश पोटे यांच्या हस्ते महाविद्यालयात वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.सहदेव आहेर आणि उद्घाटक डॉ.गणेश पोटे, कोल्हापुर व सांगली येथे जाऊन मदतकार्य केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वंयसेवकांचा प्रेरणादायी सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी उद्घाटनपर मनोगतात पोटे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जाणे गरजेचे असल्याचे सांगितले. आपण समाजाचे काहीतरी देणे लागत असल्याने समाजासाठी सकारात्मक विचारांच्या माध्यमातून यश संपादन करण्याची जिद्द अंगी बाळगल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यश सहज लाभते, त्यासाठी प्रयत्नांची जोड असणे गरजेचे आहे असा स्वानुभव सांगितला. पदवी पातळीवर असताना विद्यार्थ्यांनी नित्य वाचनाला व चिंतनाला महत्व दिले पाहिजे असे मत व्यक्त केले.यावेळी महाविद्यालयातील स्पर्धा परिक्षा केंद्राला डॉ.पोटे यांनी शुभेच्छा देऊन महाविद्यालयातील प्राचार्य,प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे कौतुकही केले.
प्राचार्य डॉ. सहदेव आहेर यांनी पाच वर्षात महाविद्यालयात झालेल्या स्पर्धा परिक्षा केंद्राची माहिती दिली.तसेच विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून परिश्रमानेच यश संपादन केले तर सर्वसामान्य कुटुंबातील मुलगाही अधिकारी बनतो असे सांगितले.अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत स्पर्धा परिक्षेने बदल घडवता येते त्यामुळे पैशापेक्षा लोकसेवेला महत्व द्या असे सांगितले.
कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा.प्रविण जाधव व सोनाली बेलोटे यांनी तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य मनोहर एरंडे यांनी मांडले.
चौकट
ग्रामीण भागात सुरू झालेले हे महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या यशासाठी नेहमीच कटीबद्ध असून निघोज ही गुणवंताची भुमी आहे त्यामुळे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतल्यास अनेक अधिकारी या परिसरातून निर्माण होतील- प्राचार्य डॉ. आहेर
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद