राज्यात डेंगीसदृश आजाराने थैमान

0
नगर : राज्यात डेंगीसदृश आजाराने थैमान घातले आहे. डेंगी नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत; मात्र त्यास म्हणावे तसे यश येत नाही. केलेल्या उपायांवर संततधार पाऊस पाणी फिरवीत असल्याने ही साथ वाढतच आहे. राज्यातील 6390 जणांना डेंगीची लागण झाली असून, आतापर्यंत चौघांचा त्यात मृत्यू झाला आहे.

राज्यातील अनेक भागांत दिवाळीनंतरही परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. पावसाचे पाणी छतांवर व खड्ड्यात साचत असल्याने, त्यात डेंगीचे डास तयार होतात. ते चावल्याने ही साथ पसरत आहे. डेंगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती मोहीम राबविली जात आहे. मात्र, त्यांना हवा तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याने ही साथ राज्यभर फैलावत आहे.

राज्यातील 6390 जणांना डेंगीची लागण झाली असून, त्यात 26 शहरांतील 3545 जणांचा समावेश आहे. आतापर्यंत चौघांना आपला जीव गमवावा लागला. 2017 मध्ये ग्रामीण भागात 2053, तर शहरात 5776, अशा एकूण 7829 जणांना डेंगीची लागण होऊन 65 जणांचा मृत्यू झाला होता.

2018मध्ये ग्रामीण भागात 3700, तसेच 7338 शहरी भागातील नागरिकांना डेंगीची लागण होऊन 70 जणांचा मृत्यू झाला होता. मागील तीन वर्षांपासून ग्रामीण भागापेक्षा शहरात डेंगीची लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे.

प्रत्येकाने घरात एक दिवस कोरडा पाळणे आवश्‍यक आहे. अडगळीतील वस्तूंची लवकर विल्हेवाट लावणे महत्त्वाचे आहे. घराशेजारी साचलेल्या पाण्यात "ऑईल' टाकल्यास तेथे डास तयार होत नाहीत. कोणताही ताप असल्यास, त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करणे महत्त्वाचे आहे. हे सर्व उपाय प्रत्येकाने केले, तर डेंगीची साथ लगेच आटोक्‍यात येईल.
- संदीप सांगळे, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा परिषद, नगर

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top