निघोज प्रतिनिधी
निघोज व परिसरातील वाडीवस्तीवर बिबट्यांचा वावर मोठय़ा प्रमाणात वाढल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. परिसरात पिंजरे लावण्याची मागणी सरपंच ठकाराम लंके, माजी सरपंच चंद्रकांत लामखडे, संदीप पाटील फौंडेशनचे संस्थापक सचिन पाटील वराळ, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे व सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पांढरकर यांनी वनअधिकाऱ्यांशी थेट संपर्क करुन केली आहे.
रविवारी रात्री नउ वाजता बिबट्याने पांढरकरवाडी येथील प्रगतीशील शेतकरी दौलतराव शंकर पांढरकर यांची शेळी मारली तसेच त्याच दरम्यान तेथून एक किलोमीटर अंतर असलेल्या कुंड परिसरातील नाना वराळ यांचे कुत्रे मारले तसेच सोमवारी रात्री कुंड वस्तीवरील शिवाजी विष्णू वराळ यांची शेळी मारली अशा प्रकारे बिबट्यांनी या भागात दहशत निर्माण केली आहे. तसेच दोन दिवसांपुर्वी लाळगे व ढवणवाडी वस्तीवर बिबट्या दिसल्याने घबराट निर्माण झाली आहे. सध्या कांदा लागवड तसेच शेतीचे कामे मोठय़ा प्रमाणात सुरु असून विजेचे भारनियमन दिवसा असल्याने शेतकऱ्यांना शेतीला पाणी भरण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागत आहे. परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने व बिबट्यांची संख्या जास्त असल्याने कधी वडनेर तर त्याचवेळी निघोज परिसरात बिबट्या दिसत असल्याने पिंजरे मोठय़ा प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणी जनतेतून होत आहे. मात्र सध्या पारनेर येथील वनखात्याकडे फक्त चार पिंजरे उपलब्ध असून वडझिरे, ढवणवाडी, बाभुळवाडा व कुरूंद कोहकडी या परिसरात हे चार पिंजरे उपलब्ध करून दिले आहेत. पारनेर येथील वनखात्याने तालुक्यासाठी दहा पिंजरे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव नगर येथील कार्यालयाकडे पाठवला आहे. मात्र अद्यापही त्याची पुर्तता न झाल्याने पारनेर तालुक्यातील बहुतांश गावावर बिबट्यांची दहशत मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. यासाठी नगर येथील वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पारनेर तालुक्यासाठी पिंजरे मोठय़ा प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी जनतेतून होत आहे. तसेच रात्रीचे विजेचे भारनियमन रद्द करण्यात यावे अशी मागणी सरपंच ठकाराम लंके, माजी सरपंच व निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत लामखडे, संदीप पाटील फौंडेशनचे संस्थापक सचिन पाटील वराळ तसेच शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी विज अधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र या मागणीची दखल अद्यापही घेण्यात आली नाही. लवकरात लवकर विजेचे रात्रीचे भारनियमन रद्द न केल्यास बिबट्याच्या भितीने शेतीचे मोठे नुकसान होणार आहे. अगोदरच परतीच्या पाउसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात या बिबटयांच्या दहशतीने शेतकऱ्यांसहीत जनता घाबरुन सैरभैर झाली आहे. म्हणून विजेचे भारनियमन व पिंजरे वाढवण्याची मागणी या दोन्ही मागण्या संबधीत अधिकाऱ्याने तातडीने मंजूर कराव्यात अशी मागणी गाव व परिसरातील प्रमुख पदाधिकारी व जनतेतून करण्यात आली आहे.
चौकट
आज रात्री(दि.19)सव्वा सात वाजता सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील डि फार्मसी कॉलेज जवळ बिबट्याने दर्शन दिल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. तसेच वराळ यांच्या वस्तीवरील दोन शेळ्यावर हल्ला केल्याची माहिती हेडकाँस्टेंबल अशोक निकम यांनी दिली आहे. तसेच याबाबत लोकांनी सावध राहावे असे आवाहन पत्रकार दत्ता उनवणे व NEWS महाराष्ट्र दर्शनचे सागर आतकर यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केले आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद