लॉकडाऊन काळात संगमनेरकरांची इतरांसाठी भरीव मदत कौतुकास्पद – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

0
शिर्डी, दि. १७ : कोरोना हे देशावर, राज्यावर आलेले मोठे संकट आहे. यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. हॉटस्पॉट केलेल्या ठिकाणी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळण्याबरोबर सतर्कता बाळगली पाहिजे.
हॉटस्पॉट ठरू पाहणाऱ्या ठिकाणी केलेली लॉकडाऊनची उपाययोजना केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आहे. स्वयंशिस्त महत्त्वाची ठरणार असून लॉकडाऊनमध्ये परप्रांतीय, अत्यंत गरीब, हातावरचे रोजंदारी करणारे या सर्वांसाठी संगमनेर तालुक्यातील जनतेने केलेली भरीव मदत कौतुकास्पद ठरली आहे - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
एसएमबीटी दंत महाविद्यालयाच्या प्रांगणात व्यापारी व इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष निलेश जाजू, प्रकाश कलंत्री, संतोष करवा, ओंकारनाथ भंडारी, सुमित पंथ, शरद गांडुळे, अरुण शहरकर, अमित अटल, सोनू राजपाल, सुयोग मेहता आदींसह  विविध संघटनांचे  पदाधिकारी  उपस्थित होते. यावेळी संगमनेर शहर, हॉटस्पॉट भाग, तालुक्यातील कोरोनाबाधित गावे यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी नामदार थोरात म्हणाले की, कोरोना हे आता मानवजातीवरील संकट आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सर्वांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र संकटाशी सामना करण्याकरता आपल्याला शासकीय नियमांचे पालन केले पाहिजे. या काळामध्ये अनेक परप्रांतीय मजुरांचे स्थलांतर झाले. या सर्वांसाठी पदाधिकाऱ्यांनी प्रवासाची व्यवस्था व खर्चाची मदत केली आहे.  परंतु तरीही अनेक मजूर आपल्या लहान मुलांचा, कुटुंबातील महिलांचा विचार न करता गावाकडे पायी चालले आहे, हे अतिशय चिंताजनक आहे. अशा अडचणीच्या काळामध्ये संगमनेरकरवासीयांनी या परप्रांतीय मजुरांच्यासाठी केलेली भोजनाची व्यवस्था, तसेच शहरातील अत्यंत गरीब व हातावर काम करणारे रोजगार यांच्यासाठी दररोज भोजनाचे डबे पुरवण्याची व्यवस्था त्याबरोबर अनेकांनी परप्रांतीय मजुरांच्या अंघोळीची व्यवस्था केली. वैद्यकीय सेवा, औषधे अशा विविध सुविधा देऊन माणुसकीचा धर्म जपला आहे. संकटामध्ये परप्रांतीयांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी संगमनेर तालुक्यातून आपण विविध बस उपलब्ध करुन दिल्या आहेत. आणि त्यातून उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशमध्ये अनेक मजुरांना पोहोचते केले आहे. यासाठी अनेकांचे आभाराचे संदेश आले आहेत. त्या सर्वांनी महाराष्ट्राबद्दल आणि तालुक्याबद्दल ऋण व्यक्त केले. या संकटसमयी संगमनेरकरवासीयांनी दाखवलेली माणुसकीही अत्यंत कौतुकास्पद असून हे कार्य इतरांसाठी दिशादर्शक ठरले असल्याचे ते म्हणाले.

आमदार डॉ.तांबे म्हणाले की, नागरिकांनी अनावश्यक गर्दी  टाळली तर कोरोनाची साखळी तोडली जाऊ शकते. यासाठी सगळ्यांनी सतर्कता बाळगली पाहिजे.  मास्कचा वापर करणे, वेळोवेळी हात धुणे हे सध्या गरजेचे आहे. त्याचबरोबर आगामी काळामध्ये पावसाळ्यापूर्वी काही साथींचे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने घाबरून न जाता या साथींच्या आजाराची नियमित तपासणी करून घ्यावी. मात्र कोरोनाची काही लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या  वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असेही ते म्हणाले. यावेळी व्यापारी व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यवसाय बंद असतानाही नामदार बाळासाहेब थोरात हे राज्यात कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी करत असलेल्या कार्याबाबत संगमनेर तालुक्याचेवतीने अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top