कोरोनाकाळ- लॉकडाऊनपासून वर्षपूर्ततेकडे

0
जागतिक महासत्ता ठरू पाहणाऱ्या चीनमध्ये अचानकपणे कोरोना नावाच्या व्हायरसने डोकं वर काढलं आणि हळूहळू संपूर्ण जगभर हा व्हायरस वणव्याप्रमाणे पसरला. भारतही यास अपवाद ठरला नाही. जेव्हा शेजारील राष्ट्रात हा व्हायरस आपली आग ओकत होता त्याच वेळी जर भारतीय प्रशासनाने जोरदारपणे कठोर पावले उचलली असती तर आजची ही परिस्थिती काही वेगळीच दिसली असती. असोत या ना त्या अन्योन्य कारणाने हा व्हायरस कोव्हीड-१९ नाव धारण करून भारतात पोहोचला आणि द्रुतगतीने सबंध भारतभर आपले पाय पसरू लागला. यावेळी भारताच्या केंद्रीय प्रशासनाच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च २०२० रोजी एका दिवसासाठी भारतात पहिलं वहिलं लॉकडाऊन जाहीर केलं. लॉकडाऊनप्रती भारतीय जनतेचा एवढा अफाट उत्साह पाहून मोदींनी हे पुढील दिवसापासून काही महिन्यांकरिता वाढविले व ते पुढेही सातत्याने असेच वाढत राहिले. या लॉकडाउन कालखंडात सर्वच क्षेत्रात आर्थिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणावर पीछेहाट झालेली दिसून येते. सामान्य जनता, मध्यमवर्ग, शेतकरी, मजूर, व्यापारी, चाकरमान्यांचा वर्ग हा खऱ्या अर्थाने आर्थिक संकटात सापडला. जगातील बहुतांशी राष्ट्रांत जवळजवळ हीच परिस्थिती असलेली दिसते. शेअर मार्केट, बाजारभाव, महागाई इत्यादी सर्वच बाबतीत समायोजन राहिलेले दिसून येत नाही. बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली, अनेक कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचे प्रश्न आ वासून उभे राहिले. बहुतांशी लोकांचा भविष्यनिर्वाह निधी हा याच काळात खर्च झाला व उपासमारीची वेळही ओढवली. कोरोनाने अक्षरशः सबंध राष्ट्रच जणू जीव मुठीत धरून जगते आहे असे भासत होते. 
               केंद्राबरोबरच राज्य सरकारचेही या काळात आर्थिकदृष्ट्या कंबरडं मोडलं आणि सर्व प्रक्रिया जवळजवळ ठप्प राहिल्या. ना नोकर भरती ना प्राथमिक सुविधा सर्वथैव फक्त आरोग्य आणि संरक्षण व्यवस्था यावरच राज्य सरकारचे लक्ष केंद्रित राहिलं या काळात पोटापाण्याचा प्रश्न मात्र बिकटच होत राहिला. एकूणच या काळात सामाजिक व सांस्कृतिक अराजकताच सर्वत्र प्रतीत होत होती. ना कुठलाही सण-उत्सव, यात्रा-जत्रा, लग्न सोहळा वा सामाजिक कार्यक्रम फक्त आणि फक्त 'मास्क - सॅनिटायझर - सोशल डिस्टंसिंग' या त्रिसुत्रीतच समाज बंदिस्त राहिला. यावेळी समाजमन खऱ्या अर्थाने पोपटाप्रमाणे पिंजऱ्यात बंदिस्त झालं. आता जवळजवळ ह्या परिस्थितीस एक वर्ष होत आलं आहे. जनतेच्या मनातील कोरोणाबद्दल पूर्वीची भीती नष्ट होऊन आजच्या उदरनिर्वाहाकडे जनतेचा ओढा वाढला आहे. मध्यंतरी आटोक्यात आलेली परिस्थिती आता पुन्हा जटिल बनत चालली आहे. आज लॉकडाऊनपासून आपण वर्षपुर्ततेकडे आलो आहोत. या काळात व्याक्सिनेशनची प्रक्रिया जोरदार पद्धतीने सबंध भारतभर सुरू आहे. लवकरच ही परिस्थिती आटोक्यात येऊन पूर्वीचे वैभव व संपन्नता राष्ट्रास प्राप्त होईल व जनमार्गक्रमण अव्याहतपणे सुरू होईल अशी
आशा वाटते. भवतु सर्वमंगलम् !
प्रा. विशाल रोकडे
इतिहास विभागप्रमुख,
श्री.मुलिकादेवी महाविद्यालय, निघोज 
संपर्क - ९९७०७१७१४८



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top