पिंपरी जलसेन | News महाराष्ट्र दर्शन |प्रतिनिधी: चंद्रकांत कदम
पारनेर : तालुक्यातील वडझिरे येथील सेंट्रल बँकेला गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून शाखा प्रबंधक नसल्याने अनेक ग्राहकांची कामे रखडली आहे. नवीन शाखा प्रबंधक कधी येणार हे देखील माहीत नसल्याने ग्राहकांना रोज हेलपाटे मारावे लागत आहेत.
चिंचोली, पिंपरी जलसेन, वडझिरे, पाडळी यासह परिसरातील ४,५ गावांसाठी नॅशनल बँक म्हणून सेंट्रल बँक काम पाहते. असंख्य ग्राहक असणाऱ्या या बँकेत लाखोंची देवाणघेवाण रोज होत असते. परंतु तत्कालीन महिला शाखाप्रबंधक बाळंतपणाच्या रजेवर फेब्रुवारी महिन्यात गेल्या आहेत. तेव्हापासून आजतागायत ४ महिने होऊन गेले असून अद्याप याठिकाणी नवीन शाखाप्रबंधक अथवा तात्पुरत्या स्वरूपाच्या नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी करण्यात आली नाही. शेतकरी सन्मान योजना, संजय गांधी, श्रवण बाळ वृद्धपकाळ योजनेसह अनेक योजनेचे पैसे या बँकेत ग्राहकांचे जमा होत आहेत. त्यात काही ग्राहकांनी बरेच वर्ष खात्यावर व्यवहार न केल्याने ते खाते बंद झालेले आहे. ते खाते सुरळीत सुरू शाखा प्रबंधकच करू शकतात असे बँकेतील कर्मचाऱ्यांकडून संगीतले जात असल्याने नागरिकांना शाखा प्रबंधक येण्याची प्रतीक्षा आहे. शाखा प्रबंधक कधी येतील ? ग्राहकांची कामे कधी मार्गी लागतील ? असे विचारले असता मॅनेजर आल्यावरच ती कामे मार्गी लागणार असून लॉकडाऊन असल्याने नवीन मॅनेजर कधी येतील हे सांगता येणार नसल्याचे बँकेतील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
कोरोना मुळे सर्वत्र संचार बंदी असल्याने बँकेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडलेल्या आहेत. येत्या जुलै महिन्यात या बदल्या होऊ शकतात. वडझिरेचे शाखा प्रबंधक यांची बाळंतपणाची सुट्टी जुलै मध्ये संपत आहे. त्यामुळे जुलै महिन्यातच येथे नवीन शाखा प्रबंधक येऊ शकतो असे सांगण्यात येत आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद