महाराष्ट्र दर्शन न्युज पारनेर/ प्रतिनिधी सागर आतकर :
जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील ५४ वर्षीय तरुणाने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचा बहुमान मिळवून जवळे गाव तसेच तालुक्याचे नाव देशात झळकावले आहे.
ज्ञानदेव धोंडिबा पठारे यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी न थांबता सलग १९ तासात चालून १०२ किलोमीटर अंतर पार करत ८७ किलोमीटरचा असलेला विक्रम मागे टाकला. त्यांच्या या विक्रमाची इंडीया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे तालुक्यातून तसेच जवळा ग्रामस्थाच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
बुधवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी २ वाजता जवळे बसस्थानकापासून ते आळेफाटा व पुन्हा आळेफाटा ते जवळे हे असे एकूण १०२ किलोमीटर असणारे अंतर गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत पायी चालत १९ तासात हे रेकॉर्ड पूर्ण केले. याआधी सन २०२० मध्ये मुंबईतील अठरा वर्षाच्या युवकानी १९ तासात ८९ किलोमीटर पायी चालत हे रेकॉर्ड केले होते असे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे दिल्लीचे प्रतिनिधी विश्वदीपरॉय चौधरी यांनी सांगितले.
जवळे येथील ज्ञानदेव धोंडिबा पठारे वय वर्ष ५४ यांनी सलग अखंडपणे १९ तासात १०२ किलोमीटर पायी चालण्याचे रेकॉर्ड केले असल्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या वतीने त्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देत पठारे यांचा सन्मान केला. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स ही संस्था भारतात सतरा वर्षापासून काम करत असून भारतात अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे विक्रम केले असल्याने त्यांना आम्ही सन्मानित केलेले आहे. या सन्मानामुळे इतरांनाही प्रेरणा मिळते. आपणही जीवनात काहीतरी यशस्वी असे कार्य करून दाखण्याची जिद्द आपल्यात निर्माण होत असते असे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे दिल्लीचे प्रतिनिधी विश्वदीपरॉय चौधरी यांनी सांगितले.
या स्पर्धेसाठी भरत आबासाहेब भापकर व गणेश महादेव बढे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले व त्यांच्यामुळेच या स्पर्धेत मी उतरलो असल्याची प्रतिक्रिया ज्ञानदेव पठारे यांनी आपल्या भाषणातून दिली.
"शालेय शिक्षण झाल्यानंतर शेतात जात असताना मास्तरांच पोरगं बैला मागे फिरतो अशी टिंगलटवाळी केली होती, तिला प्रतिउत्तर म्हणून आपण काहीतरी जीवनात काहीतरी करून दाखवण्याची खूणगाठ मनाशी बांधून आज या ध्येयापर्यंत मी पोहोचलो आहे- ज्ञानदेव पठारे"
जवळे ते आळेफाटा पुन्हा आळेफाटा ते जवळे या प्रवासादरम्यान त्यांना त्यांचे मित्र परिवार महादू पठारे, अशोक सोमवंशी, नवनाथ रासकर, नवनाथ सालके, बाळासाहेब बरशिले, परभू पठारे, रवींद्र इंगळे, संपत सोमवंशी आदिंची मोलाचे सहकार्य लाभले.
गुरुवारी सकाळी ९ वाजता जवळे येथे पोहोचल्यानंतर जवळे ग्रामस्थांनी ज्ञानदेव (माऊली) पठारे यांची बैलगाडीतून मिरवणूक काढत आनंद उत्सव साजरा केला.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, जवळे गावचे माजी सरपंच सुभाष आढाव, संतोष पठारे, माजी उपसरपंच ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य किसनराव रासकर, लोकजागृती संस्थेचे रामदास घावटे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य कृष्णाजी बडवे, ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक गंगाधर महादू मेहेर, पोलीस पाटील बबनराव सालके, संभाजी आढाव, शेखर सोमवंशी, रितेश सोमवंशी आदी मान्यवर तसेच जवळे ग्रामस्थ व तरुण मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद