पारनेर/ महाराष्ट्र दर्शन न्युज:
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या श्री.क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा, या राज्यस्तरीय "ब" वर्ग तीर्थक्षेत्रावर माघ पौर्णिमा उत्सव (नव्याची पौर्णिमा) उत्सवाचे सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या पौर्णिमेला नव्याची पौर्णिमा म्हणूनही पारंपारिक महात्मे आहे. शेतकऱ्यांच्या शेतातून तयार झालेल्या नवीन धान्याच्या राशी घरात येतात. त्या धन्याचे दान आणि दीपदान मंदिरात करण्याची या पोर्णिमेला परंपरा आहे. महिला भक्तवर्ग साजशृंगार करून नव्या धान्याचे दिवे तयार करून ते प्रज्वलित करून मंदिरात दीपदान करतात. घरात नवीन धान्याची रास आली म्हणून कुलधर्म, कुलाचार करून संसारात सुख समृद्धीची प्रार्थना करतात. वसंत ऋतुची आगमनाची चाहूल या पौर्णिमेला लागते म्हणूनही निसर्ग देवतेला प्रसन्न राहण्यासाठी भक्तांकडून देवाची भक्ती केली जाते.
सकाळी ६ वाजता श्री.खंडोबा मूर्तीचे मंगल स्नान, पूजा साजशृंगार, महाअभिषेक पूजा आरती मानकरी नवनाथ कोंडीबा भोर, लता नवनाथ भोर, गुलाब शंकर भोर, संगीता गुलाब भोर, मुक्तजी भगवंत भोर, यमुना मुक्तजी भोर यांच्या हस्ते करण्यात आली.
तर आलेल्या भाविक भक्तांना महाप्रसाद समस्त ग्रामस्थ भोरवाडी (जय मल्हार सेवा मंडळ) कांदळी वडगाव तालुका जुन्नर यांचे वतीने सालाबाद प्रमाणे महाप्रसाद वाटप करण्यात आले.
देवस्थानतर्फे पिण्याचे पाणी, दर्शन बारी, वाहने पार्किंग नियोजन आहे. श्री. खंडोबा मंदिर परिसरातील देवस्थानच्या सर्व वास्तू कमानी, कठडे, सभामंडप, दर्शन मार्ग, दरवाजे, ग्रील, रेलिंग इत्यादी नवीन रंग काम चालू आहे. तसेच मुख्य मंदिरानांही नवीन रंगकाम करणे नियोजन आहे. तरी भाविक भक्त, देणगीदार यांनी रंगकामासाठी यथाशक्ति देणगी देवस्थानला देऊन सहकार्य करावे. असे आवाहन देवस्थानतर्फे अध्यक्ष ॲड. पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, सचिव महेंद्र नरड, खजिनदार हनुमंत सुपेकर, सहसचिव मनीषा जगदाळे, विश्वस्त किसन धुमाळ, आश्विनी थोरात, अमर गुंजाळ, चंद्रभान ठुबे, किसन मुंडे, मोहन घनदाट, बन्सी ढोमे, दिलीप घोडके, देविदास क्षीरसागर, साहेबा गुंजाळ इत्यादींनी केलेले आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद