युरोपात 'रेनेसान्स' म्हणजेच प्रबोधनाचा काळ. याच काळाला आधुनिकतेचा अविष्कार मानले गेले. या काळात भारतात मात्र दैववाद, सामंतशाही, राजेशाही मोठ्या प्रमाणावर बळावलेली होती. आधुनिकतेचा भारतीय उपखंडात लवलेशही आढळून आला नाही. परंतु परकीयांच्या आगमनाने भारतात आधुनिक मूल्यांचा प्रसार होण्यास मदत झाली. या प्रक्रियेत ब्रिटिश आघाडीवर होते. ब्रिटिशांनी भारतात प्रथमतः इतिहास लेखन प्रवाही केले आणि त्याचाच परिपाक म्हणून आंग्लशिक्षित भारतीयांनीही स्वराष्ट्राचा नव्याने शोध घेत संशोधकीय इतिहासलेखन भारतात सुरू केले. त्यातूनच वासाहतिक इतिहासास छेद देत राष्ट्रवादी इतिहास लेखनाची परंपरा भारतात निर्माण झाली. यावेळी सर्वांगी स्वरूपाचे पारंपारिक प्रवाह इतिहासरुपी प्रवाहाद्वारे जगासमोर यावयास सुरुवात झाली. त्यापैकीच एक प्रवाह हा भारतातील प्राचीन काळानंतर अवतरलेल्या मध्ययुगीन काळाचा अभ्यास करण्यास गतीमान झालेला दिसतो. याच प्रवाहातील एका शाखेने संतपरंपरेने भारतीय समाजात प्रबोधनाद्वारे सातत्याने चालविलेल्या प्रयत्नांचा सकारात्मक अभ्यास आरंभिला. आणि यातूनच 'संतपरंपरा' अधिकाधिक समाजात प्रसृत होऊ लागली. या संत परंपरेत कबीर, गुरुनानक , रोहिदास, मीरा, नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, सावतामाळी, चोखामेळा, गोरा कुंभार, एकनाथ, मुक्ताई, जनाबाई, सेना, सेवालाल इत्यादी सर्व संतांनी भारतात प्रबोधन पर्व आविष्कृत केले. या संत परंपरेतील एक प्रमुख संत म्हणजे संत रोहिदास महाराज होय. संत रोहिदास महाराजांची आज जयंती म्हणूनच आज या ठिकाणी आपण संत रोहिदास महाराजांच्या कार्याचा अल्पसा आढावा घेत आहोत.
रघुराम व कर्मादेवी या चर्मकार दांपत्यास रविवार माघ पौर्णिमा संवत् १४३३ मध्ये बनारस अर्थातच काशी जवळील मांडूर या गावी पुत्रप्राप्ती झाली. या बालकाचा जन्म रविवारचा तसेच सूर्याप्रमाणे तेजस्वी बालक जन्मास आले म्हणून त्याचे नाव 'रविदास' असे ठेवण्यात आले.
रविदासांना रविदास, रैदास, रईदास तसेच महाराष्ट्रात रोहिदास या नावानेही ओळखले जाते. अगदी बालपणापासूनच रोहिदास जात्याचे हुशार होते. त्यांनी बालवयात अनेक प्रसंगांतून ते वेळोवेळी सिद्ध केले होते. त्याकाळात बालविवाह करण्याची रीत असल्याने रोहिदासांचाही विवाह अवघ्या बारा-तेरा वर्षांच्या वयातच लोना देवी यांच्याशी झाला. परंतु लहानपणापासूनच भक्तिमार्गाकडे वळालेल्या रोहीदासांवर या विवाहाचा काहीही परिणाम झाला नाही. त्यांनी या वेळीही भक्तिमार्गास प्राधान्य दिले. रोहिदासांच्या याच भक्तीमार्गामुळे त्यांच्या माता-पित्याने त्यांना घराबाहेर काढले व त्यांना पत्नीसोबत स्वतःचा उदरनिर्वाह करावा लागला. असे असतानाही त्यांनी कुटुंबापेक्षा भक्तीमार्गावरच अधिक भर दिला. पुढे रोहिदास व लोणादेवी यांना विजयदास नावाचा पुत्र प्राप्त झाला. परंतु त्यानंतर मात्र रोहिदासांनी विरक्तीचे जीवनच पसंत केले.
एकदा रोहिदास ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नानासाठी गेले असता गंगा स्नान करुन बाहेर पडल्यावर त्यांना काही ब्राह्मण पंडितांनी घेरले व रोहिदासांना म्हटले की, "अरे शुद्रा, तू नीच जातीचा असून, तू पवित्र अशा गंगेत स्नान केले, तू नीच कृत्य करुन, आम्हा सर्व ब्राह्मणांचा अपमान केला तसेच तु गंगेचे पवित्र पाणी घाण केले..." यावर रोहिदासांनी उत्तर दिले की, "पंडितजी तुम्ही विनाकारण क्रोध का करता ? पाच तत्त्वापासून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र ह्या सर्वांची उत्पत्ती झाली आहे. आत्मा अमर आहे. जात ही जीव-प्राणात नसते. जातीभेद करणे किंवा पाळणे हा मूर्खपणा आहे. मानवाची जात मानव आहे. अन्य जात समजतो, तो पापी मनुष्य होय." रोहिदासांचे असे क्रांतिकारी विचार ऐकून त्या ब्राह्मण पंडितांनी तेथून जाणे पसंत केले. पुढील एका प्रसंगी संत रोहिदासांशी संत कबीरांनी शास्त्रार्थावर वाद-विवाद केला असता कबीरांना पराभव स्वीकारावा लागला. यावेळी संत कबीरांनी देखील संत रोहिदासांबाबत "संतन मे संत रविदास" असे गौरवोद्गार काढले आहे.
संत रोहिदासांनी आपल्या वचनांद्वारे तत्कालीन भारतीय समाजात प्रबोधन घडवून आणण्याचे कार्य केले. रोहिदास म्हणतात,
'नरसिंह उठे पाल जग, गरीब सब ही मिटी जाई l
धरि धरि रहे समाय, ठौर खाली नही काई ll'
अर्थातच, जगाचा रक्षणकर्ता नरसिंह प्रगट झाला तर तुम्हा विरोधकांचा सर्व गर्व नाहीसा होईल. प्रभूने सर्व जग व्यापले आहे. त्याच्याशिवाय काही रिकामे नाही.
'वंदे जानि साहिब गनी l समझि वेद कनबे बोलै काबै मैं क्या मनी ll टेक ll'
अर्थातच, हे साधका, तो ईश्वर धनिक माणसाप्रमाणे स्वतंत्र वृत्तीचा आहे, वेद पुराणावर विसंबू नको. काबा इत्यादी तीर्थक्षेत्रीच तो आहे असे नाही.
'मन चंगा तो कठौती में गंगा' अर्थातच, मन पवित्र असेल तर छोट्याशा भांड्यातही गंगा अवतरते परंतु मन अपवित्र असेल तर प्रत्यक्ष गंगेत स्नान केले तर गंगा अपवित्र होते असे ते मानत. एकूणच अशा अनेक वचनांतून मध्ययुगीन कालखंडात प्रबोधनपर्व अविष्कृत करण्यात संत रोहिदासांनी अमूल्य असे योगदान दिलेले आहे. म्हणूनच अनेक विद्वान संत रोहिदासांचा गौरव करतात. यापैकीच एक संत एकनाथ म्हणतात, 'रोहिदास चमार सबकुछ जाने l कठोर गंगा देख'. एकूणच संत रोहिदासांनी भारतीय प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावलेली दिसून येते.
प्रा.विशाल रोकडे
इतिहास विभागप्रमुख, श्री. मुलिकादेवी महाविद्यालय, निघोज
9970717148
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद