Sambhaji Maharaj Punyatithi: संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती. शेर शिवा का छावा, धर्मवीर, धर्माभिमानी, शूरवीर अशी अनेक विशेषणे त्यांना लागू पडतात. समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केलं. शत्रूच्या तावडीत सापडल्यानंतरही ते शत्रूपुढे झुकले नाहीत. त्यांचे शौर्य अपरंपार होते. अशा शूर राजाची आज पुण्यतिथी. फाल्गुन अमावस्येला छत्रपती संभाजी महाराजांचे निधन झाले. त्यामुळे आज तिथीनुसार त्यांची पुण्यतिथी किंवा बलिदान दिवस. आज त्यांच्या स्मृतीदिन जाणून घेऊया युगपुरुषाविषयी काही खास गोष्टी:
# संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 साली पुरंदर किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे ते पुत्र. संभाजीराजे लहान असतानाच सईबाईंचे निधन झाल्याने जिजाऊंनी त्यांचा सांभाळ केला.
# संभाजी महाराज यांना लहानपणापासूनच शास्त्र आणि शस्त्र ज्ञान देण्यात आले. 16 जानेवारी 1681 मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला.
# छत्रपती संभाजी महाराज अत्यंत शूर आणि देखणे होते. तसंच हजरजबाबी आणि रोखठोक बोलणारे होते, असे इतिहासातील अनेक घटनांमधून समोर येते.
# संभाजी महाराजांना वयाच्या 15 वर्षापर्यंत संस्कृत, पोर्तुगिज यांसारख्या एकूण 13 भाषा येत होत्या.
# कोकणच्या किनारपट्टीवर कब्जा मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचे लग्न जीवूबाई यांच्याशी लावून दिले. लग्नानंतर त्यांचे नाव येसूबाई असे नामकरण करण्यात आले.
# एकही युद्ध न हरलेले असे छत्रपती अशी संभाजी महाराजांची कीर्ती आहे. संभाजी महाराज सुमारे 150 युद्ध लढले मात्र त्यांना एकाही युद्धात हार पत्करावी लागली नाही.
स्वकीयांच्याच फितुरीमुळे संभाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीत सापडले. त्यानंतर औरंगजेबाने त्यांचे अत्यंत क्रूरपणे हालहाल केले. सुमारे 40 दिवस त्यांनी मरण यातना सहन केल्या. मात्र तरीही त्यांनी स्वराज आणि धर्माप्रती असलेली निष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना 'धर्मवीर' असेही म्हटले जाते. अखेर 11 मार्च 1689 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यादिवशी फाल्गुन अमावस्या होती.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद