नागपूरमध्ये संध्याकाळी 7 वाजून 47 मिनिटांनी आकाशात रहस्यमय प्रकाश दिसला. जवळपास पाच ते सात प्रकाशाचे भाग आकाशातून वेगात जाताना दिसले.. नागपूर शहरातील अनेक भागात लोकांनी हा प्रकाश पाहिला. काहींनी त्याचे फोटो व व्हिडिओ मोबाईलमध्ये काढले. जवळपास 15 सेकंदापर्यंत हा प्रकाश आकाशात दिसल्याचे नागरिकांनी सांगितले.
महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील इंदूर, खरगोन, झाबुआ व बरवानी जिल्ह्यातही असेच दृश्य अनेकांनी पाहिल्याचा दावा केलाय. अमेरिकन शास्त्रज्ञ जोनाथन मॅकडॉवल (Jonathan McDowell) यांच्या मते हे चीनचे रॉकेट ‘चेंग झेंग 3-बी’ होते. हे रॉकेट गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रक्षेपित केलं होतं. पृथ्वीच्या दिशेने परत येताना, वातावरणाच्या संपर्कात आल्यानं त्याचे भाग जळाले.
नागपुरातील ‘स्कायवॉच ग्रुप’चे चेअरमन सुरेश चोपडे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की “या तेजस्वी उल्का पावसाशी संबंधित असण्याची शक्यता खूप कमी आहे. मला वाटतं, एकतर कुठल्या तरी देशाचा उपग्रह चुकून पडला असावा किंवा काम पूर्ण झाल्यावर जाणूनबुजून क्रॅश केला असावा…!”
दरम्यान, या घटनेबाबत लोकांमध्ये मोठं कुतूहल निर्माण झालं होतं. त्याच वेळी नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, त्याबाबत उलटसूलट चर्चा सुरु आहेत..
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद