महाराष्ट्र दर्शन न्युज / पारनेर प्रतिनिधी :
निघोज जिल्हा परिषद गटात शिवसेना व राष्ट्रवादीने आपल्या पक्षांचे मेळावे घेऊन उमेदवार जाहीर केल्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वराळ कुटुंबाच्या भूमिकेकडे लागले आहे. सध्या निघोज जिल्हा परिषद गटांमध्ये पुष्पाताई संदीप पाटील वराळ या जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केल्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वराळ कुटुंब आता काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. निघोज जिल्हा परिषद गट हा संपूर्ण तालुक्यात अतिसंवेदनशील जिल्हा परिषद गट म्हणून ओळखला जातो. या जिल्हा परिषद गटावर गेल्या दहा वर्षापासून संदीप पाटील वराळ गटाचे एक हाती वर्चस्व आहे. संदीप पाटील वराळ यांच्या हत्येनंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पुष्पाताई संदीप वराळ या तालुक्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आल्या होत्या. तत्पूर्वी त्या गणामध्ये पंचायत समिती सदस्य ही होत्या.
वराळ गट हा पूर्णतः विखे पाटील कुटुंबाला मानणारा असल्यामुळे प्रवरेचा आदेश वराळ कुटुंबासाठी अंतिम आहे. परंतु पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी निघोज ग्रामपंचायत मध्ये वराळ गटाला विकास कामांच्या माध्यमातून मदत केली आहे, त्या माध्यमात आमदार निलेश लंके यांच्या वराळ कुटुंबाची जवळीक वाढली आहे. खासदार सुजय विखे पाटील यांनी अलीकडील काळात आमदार निलेश लंके यांच्या विरोधात तालुका पातळीवर आक्रमक घेतलेली भूमिका व वारंवार आमदार लंके यांना आपल्या भाषणांमधून त्यांनी टीका करत टारगेट केलेले आहे. त्यामुळे विखे कुटुंबाला मानणारा वराळ गट आता निघोज जिल्हा परिषद गटामध्ये नेमका काय भूमिका घेतो याकडे आता तालुक्याचे नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गुरुवार दि. ९ जून रोजी सायंकाळी ७ वाजता संदीप पाटील वराळ यांचे मोठे बंधू व निघोज ग्रामपंचायत सदस्य तथा संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष वराळ गटाचे प्रमुख सचिन पाटील वराळ यांचा उद्या निघोज येथे अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे.
यावेळी वराळ समर्थक व संदीप पाटील वराळ मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने वराळ गटाचे हे एक प्रकारे राजकीय शक्तिप्रदर्शन या ठिकाणी होणार आहे. अभिष्टचिंतन कार्यक्रमामध्ये युवा नेते सचिन पाटील वराळ नेमकी काय भूमिका मांडणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले असून निघोज जिल्हा परिषद गटामध्ये वराळ गटाची भूमिका नेमकी कशी राहणार हे उद्याच्या कार्यक्रमानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद