महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर-श्री. क्षेत्र कोरठण / सागर आतकर
रिमझिम बरसणारा पाऊस आणि पावसामुळे तयार झालेले निसर्गरम्य वातावरण, अछाडलेल्या धुक्याच्या छायेत कोरठण गडावर गुरुपौर्णिमा भाविक भक्ताच्या मांदीआळीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
राज्यस्तरीय "ब" वर्ग तीर्थक्षेत्र असलेले श्री. क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान या तीर्थक्षेत्रावर गुरुपौर्णिमेनिमित्त धार्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ०६ वा. श्री खंडोबा मंगल स्नान, पूजा, साजशृंगार झाल्यावर सकाळी सात वाजता पारनेर तहसीलदार शिवकुमार आवळकंठे तसेच मारुती गुंजाळ व सौ. हरणाबाई गुंजाळ यांच्या हस्ते अभिषेक महापूजा आरती तसेच श्री. गगनगिरी महाराज मूर्तीची गुरुपौर्णिमेनिमित्त व्यासपूजा अभिषेक आरती करण्यात आली. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष गोपीनाथ घुले, रामदास पटाडे व भाविक भक्त उपस्थित होते.
सकाळी १० वा. श्री खंडोबा देवच्या उत्सव मूर्तीची पालखी प्रदक्षिणा मिरवणूक मंदिरातून ढोल लेझीमच्या तालावर वाजत गाजत निघाली.
पावसात भिजून आलेले भाविक पालखी पुढे ओलांडा दर्शन घेत होते. भाविक भक्त पालखीवर भंडारा खोबरे उधळण करीत सदानंदाचा येळकोट जयघोष करीत पालखीसह मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केली. लंगर तोडल्यावर पालखीला नैवेद्य अर्पण झाल्यावर पालखी परत मंदिरात विराजमान झाली.
गुरुपौर्णिमा उत्सवातील ह. भ. प. लोकेशानंद गिरी महाराज आंबेगव्हाण यांचे सद्गुरूच्या महात्म्यावर गुरुपौर्णिमेचे प्रवचन झाले. महाराजांनी आपल्या प्रवचनातून विद्यालयातील विद्यार्थिनींना संत मुक्ताबाई व्हावे तसेच गुरुपौर्णिमेला गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे. सद्गुरूंच्या सानिध्यात आल्यानंतर जीवनाचा उद्धार होतो असे महाराजांनी सांगितले. याप्रसंगी. देवस्थानचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग गायकवाड विश्वस्त किसन मुंडे, बन्सी ढोमे, हनुमंत सुपेकर, किसन धुमाळ, देविदास क्षीरसागर, जय मल्हार विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक, कर्मचारी, भाविक भक्त यांनी प्रवचनाचा लाभ घेतला. तसेच देवस्थानच्या वतीने लोकेशानंद गिरी महाराज तसेच अन्नदाते मारुती गुंजाळ यांचा सन्मान करण्यात आला अन्नदान वाटपाचे काम जय मल्हार विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी केले.
सकाळपासून पावसाची रिपरिप चालू असताना पावसातच पालखी मिरवणूक काढण्यात आली. पाऊस असला तरीही भाविक भक्तांची येजा अखंडपणे चालू होती. देवदर्शन व धार्मिक कार्यक्रमाबरोबरच भाविक भक्तांनी रिमझिम पावसाचा व परिसरावर दाटलेल्या धुक्यातील वातावरणाचा आनंद घेतला. यानिमित्ताने देवस्थान तर्फे पिण्याचे पाणी, वाहन पार्किंग, दर्शन बारी इत्यादी नियोजन करण्यात आले होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद