महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज प्रतिनिधी- सागर आतकर
पारनेर तालुक्यातील निघोज, अळकुटी, जवळे, वडझिरे, राळेगण थेरपाळ, पठारवाडी, वडनेर बुद्रुक या गावासंह तालुक्यातील अनेक घरगुती बीज ग्राहकांना ५० ते ६० हजार रूपयांची बीले आल्याने त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निघोज येथे मंगळवारी सकाळी तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेश सरडे, वसंत कवाद, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाल्यानंतर अनेक ग्राहकांनी महावितरण विरोधात संताप व्यक्त केला. उपकार्यकारी अभियंता प्रशांत आडभाई यांनी ३ रूपये ६३ पैसे दराने सरसकट वीज बिल आकरणी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
गोरगरीब, अपंग असेलल्या लोकांना ५० ते ६० हजारांची बिले आली आहेत. त्यांनी त्यांची घरे विकून ही बिले भरायची का ? मिटर रिडींग करणाऱ्या कंपनीची चुक ग्राहकांच्या माथ्यावर कशी मारली जाऊ शकते ? महावितरणने भूमिका बदलली नाही तर आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू - जितेश सरडे
दरमहा ३०० ते ५०० रूपये वीज बिल येणाऱ्या ग्राहकांना हजारो रूपयांची बिले आल्याने तालुक्यात मोठा असंतोष निर्माण झाला होता. त्यास जितेश सरडे यांनी वाचा फोडली. त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चाही केली, मात्र वाढीव बीले वसुलीचा तगादा सुरूच होता. आंदोलनात घेतलेल्या सर्व प्रश्नांची तड लागेपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत एकाही ग्राहकावर अन्याय होऊ देणार नाही. प्रसंगी पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याची वेळ आली तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही. असे यावेळी बोलताना जितेश सरडे, वसंत कवाद, ज्ञानेश्वर वरखडे यांनी संगितले.
सर्व बिले दुरूस्त करणार अशा प्रकारे जास्त आलेली सर्व बिले दुरूस्त करून दिली जातील. अवास्तव बिले घेण्यात येणार नाहीत. निघोज परिसरासाठी लेखा विभागाचा कर्मचारी बिले दुरूस्त करण्यासाठी सब स्टेशनकडे पाठविण्यात येईल.- प्रशांत आडभाई (उपकार्यकारी अभियंता)
वीजेच्या जोडासाठी दोन वर्षांपूर्वी कोटेशन भरलेल्या ग्राहकांना जोडणी देण्यात यावी, कमी अश्वशक्तीच्या वीजपंपांना जास्त अश्वशक्तीचे बील आकारण्यात येते ते कमी करावे, कमर्शीअल मिटरच्या नावाखाली अधिकचे बिल आकारण्यात येते ते आकारू नये, रोहीत्रे तसेच 'पोलची अवस्था दयनीय झाली आहे. त्याची दुरूस्ती व्हावी, ६३ ऐवजी १०० क्षमतेची रोहित्रे बसविण्यात यावीत, शॉक सर्कीटमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन अडीच वर्षे लोटली त्याची भरपाई मिळावी, भारनियमासंदर्भात आठ दिवस अगोदर माहिती देण्यात यावी आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद