महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज :
आदी माया आदी शक्ती मळगंगा देवी म्हणजे पार्वती व गंगा असून याच आदी माया आदी शक्तीची आराधना करीत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली असल्याचे प्रतिपादन गणेश महाराज वाघमारे यांनी व्यक्त केले आहे.
निघोज येथील जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील मळगंगा देवीच्या कलशारोहण प्रथम वर्धापनदिन कार्यक्रमातील किर्तन सेवेत ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. वाघमारे महाराज यावेळी म्हणाले मळगंगा देवी हे राज्यातील जागृत देवस्थान आहे. राज्यातील लाखो भाविक वर्षभरात या ठिकाणी दर्शन व माता मळगंगा देवीचा आशिर्वाद घेण्यासाठी येत असतात. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघल साम्राज्य नष्ट करण्यासाठी प्रथम देवीचा आशिर्वाद घेऊन मुघलांना सळो की पळो केले. आदी माया आदी शक्तीच्या आशिर्वादाने आपल्या देशाचा उत्कर्ष झाला. देवादीकांच्या आशिर्वादाने भारत भुमी सुजलाम सुफलाम झाली आहे. आपला भारत देश संस्कृतीमय आहे. आपल्या देशाचे अनुकरण दुसरे राष्ट्र करतात एवढी आपली धार्मिक संस्कृती महत्वपूर्ण आहे. महिलांनी यापुढे नैवेद्य न आणता शिदा आणा व उपाशी लोक आहेत. त्यासाठी पुजाऱ्याने ते देण्याचे काम करावे म्हणजे उपाशीपोटी असणाऱ्या लोकांना त्या शिद्याचा उपयोग होईल या माध्यमातून भुकेल्या माणसाला अन्न मिळेल, ही खरी ईश्वर सेवा आहे. पेढे, साडी चोळी देवीला न देता ते पैसे देवाच्या तिजोरीत टाका म्हणजे त्या पैशाचा उपयोग विकासकामांसाठी होईल. या माध्यमातून देवीच्या मंदीराचा परिसर विकासाभिमुख होईल. भक्ती म्हणजे विभक्त होईल असे करु नका. अंधश्रद्धेला थारा देऊ नका, भक्तीचा महिमा जगात वर्णीला गेला पाहिजे अशा प्रकारे भक्ती आज देवाच्या चरणी विलीन करण्याची आज खऱ्या अर्थाने गरज असल्याचे मत वाघमारे महाराज यांनी व्यक्त केले आहे.
या कार्यक्रमाला परिसरातून आलेल्या भाविकांमुळे गर्दी झाली होती. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, निघोज ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थ तसेच मुंबईकर मंडळ यांनी या कार्यक्रमाचे चांगल्याप्रकारे आयोजन केले होते. यावेळी महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत देवीचा अभिषेक व पुजा वीज वितरण कंपनीचे ठेकेदार के.डी. वराळ व त्यांच्या सुविद्द पत्नी यांच्या हस्ते करण्यात आली. किर्तनामध्ये रंगदास स्वामी महाराज बाल विद्यार्थ्यांनी भजन गात उपस्थितांचे लक्ष वेधले.
मोबाईलच्या माध्यमातून सोशल मिडियाचा वापर चांगल्या कामासाठी करणे ही सुद्धा एक प्रकारे धर्मसेवा असून वाईट कामांसाठी मोबाईल वापरणे हा अधर्म असल्याचे वाघमारे महाराज यांनी सांगितले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद