महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज / प्रतिनिधी सागर आतकर
पारनेर तालुक्यातील निघोज येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार येणार असून त्यांच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. या सभेच्या तयारीसाठी निघोज येथील पुष्कर लॉन येथे नियोजन बैठक पार पडली.
यावेळी वेगवेगळ्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये वाहन पार्किंग व्यवस्था, पाहुण्यांचा सत्कार त्याचप्रमाणे कांदा भाववाढ प्रश्नी निवेदन देणे, प्रमुख पाहुण्याचे मनोगत, तसेच व्यासपीठावरील नियोजन तसेच वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांसाठी समित्या स्थापन करणे अशा अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
या नियोजन बैठकीच्या अध्यक्षस्थानी मळगंगा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर कवाद हे होते. यावेळी निघोज ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद, माजी सरपंच ठकाराम लंके, पोपट कवाद, सोमनाथ वरखडे, शांताराम कळसकर, अँड बाळासाहेब लामखडे, ज्ञानदेव लंके, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, नामदेव थोरात, रामदास वरखडे, बबन तनपुरे, दिलीप ढवन, विठ्ठल कवाद, अमृता रसाळ आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची सभा ही शुक्रवार दिनांक १० मार्च रोजी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी होणार आहे.
गुरुवार दि.९ रोजी निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने संस्थेच्या नावलौकिकास पात्र असणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा तसेच सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दि.१० रोजी सकाळी खा. शरद पवार यांचे जवळा येथे हेलीकॉप्टरने आगमन आहे. त्यानंतर निघोज येथे येऊन मळगंगा देवीचे दर्शन, माउली संकुलाचे उद्घाटन, देविभोयरे गावातील दगडी प्रवेशद्वाराचे उद्घाटन त्यानंतर पुन्हा निघोज येथे आगमन निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचा नामांतर सोहळा " बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्था", त्यानंतर सभेच्या ठिकाणी आगमन असे नियोजन करण्यात आले आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद