शिरूर / प्रतिनिधी : किरण चौधरी
सध्या कारेगाव ता.शिरूर पर्यंत सुरू असलेली पीएमपीएमएल पुढे शिरुरपर्यंत सुरू करावी अशी मागणी विविध संस्था, संघटना, शाळा, महाविद्याल व शिरूर नगरपरीषद यांच्यावतीने पीएमपीएल प्रशासनाला पत्र देऊन मागणी करण्यात आली आहे. पालकमंत्री या नात्याने तरी चंद्रकांतदादा पाटील यांनी नागरीकांच्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर पीएमपीएमएल सेवा शिरूर पर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी होत असून याबाबत ते काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
विद्याधाम प्रशालेत पाचवी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी व विद्यार्थीनी शिक्षणासाठी शिक्रापूर, रांजणगाव, कारेगाव, फलके मळा,सरदवाडी, बोऱ्हाडे मळा व परिसरातून येतात परंतु काही ठिकाणी बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय व शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कारेगाव पर्यंत सुरू असलेली पीएमपीएमएल बस सेवा पुढे शिरुरपर्यंत सुरू करावी अशी मागणी पीएमपीएमएल प्रशासनाला केली आहे.- प्रा.प्रकाश कल्याणकर (प्राचार्य विद्याधाम प्रशाला, शिरूर)
शिरूर शहर परिसर, तालुका व शेजारील पारनेर तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, नोकरीनिमित्त कामगार, वयोवद्ध, रूग्णांना उपचारासाठी पुणे येथे तर काहींना शिरूरला ये जा करावी लागते परंतु शहाराचा बायपास, बोऱ्हाडे मळा, घावटे मळा, सरदवाडी, फलके मळा येथे एसटी बस थांबत नाही. परिणामी अनेकांची मोठी गैरसोय होत असुन कारेगावपर्यंत सुरू असलेली पीएमपीएल बस सेवा पुढे शिरुरपर्यंत सुरू करण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त शिरुर अभियान, मंगलमूर्ती स्वयंरोजगार सेवा स.संस्था, राष्ट्रीय किसान मजदूरी महासंघाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. शिरुर तहसील कार्यालय, शिरूर पंचायत समिती, सी.टी.बोरा महाविद्यालय यांनाही निवेदन देण्यात आले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर, शेतकरी संघटनेचे नितीन थोरात, सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज, सौरभ वाव्हळ, ज्ञानेश्वर भुजबळ उपस्थित होते. विविध स्तरांतून दिवसेंदिवस पीएमपी सेवा शिरूरला सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ५ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी व विद्यार्थीनी रांजणगाव ते शिरूरला शिक्षणासाठी येतात परंतु बऱ्याच ठिकाणी बस न मिळाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय व शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिरुरपर्यंत पीएमपीएमएल बस सेवा सुरु करावी अशी मागणी करण्यात आली आहे. - प्रा.संजय मचाले (प्राचार्य न्यू इंग्लिश स्कूल, शिरूर )
अनेक एसटी बस शहराच्या बाह्यमहामार्गाने जात असल्याने तसेच पुणे ते शिरूर मार्गावर अनेक ठिकाणी बस थांबत नसल्याने या ठिकाणावरून सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीतील विद्यार्थी,विद्यार्थीनी तसेच कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असून कारेगावपर्यंत सुरू असलेली पीएमपीएमएल पुढे शिरुरपर्यंत सुरू करण्याची मागणी केली आहे.- प्रा.अमोल शहा (प्राचार्य सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर)
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद