शिरूर/ प्रतिनिधी - किरण चौधरी
कारेगाव ( ता.शिरुर ) पर्यंत सुरू असलेली पीएमपीएमएल पुढे शिरुरपर्यंत सुरू करण्यासाठी एक हजार विद्यार्थ्यांनी पीएमपीएमएल प्रशासनाला पत्र पाठवून मागणी करण्यात आली असून विविध संस्था संघटना, नगरपरिषद, ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालये यांसह अनेक नागरिकांनीही पीएमपी प्रशासनाला मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने आता आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसून त्या शिवाय लोकप्रतिनिधी व प्रशासन या विषयावर गांभिर्याने लक्ष देणार नसल्याचे दिसून येत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून उमटत आहेत.
कारेगाव ( ता.शिरूर ) पर्यंत पीएमपी बस सेवा सुरु असून कारेगाव पासून ते पुढे शिरुरपर्यंतच्या मधल्या पट्ट्यात एस.टी.बस थांबत नसल्याने हायवे परिसरातील आसपासच्या गावातील विद्यार्थ्यांची, ज्येष्ठ नागरिक, महिला व कामगार वर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने गेल्या दोन वर्षांपासून पीएमपीएमएल बस शिरूरला सुरू करण्याबाबत विविध स्तरातुन तीव्र मागणी होत असून शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी १६ फेब्रुवारी २०२२ रोजी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनाही शिरूर पर्यंत पीएमपीएमएल सुरू करण्याबाबत पत्र देऊन मागणी केली होती. परंतु दिड वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटूनही अद्याप पर्यंत त्यांच्यासह जनतेच्या व विद्यार्थ्यांच्या या मागणीला यश आले नसून आता आमदार पवार या मागणीसाठी गांभिर्याने पाठपुरावा करून लक्ष घालून दिवाळीच्या आधी हि बस सेवा शिरुरला सुरू करणार का ? असा प्रश्न विद्यार्थी व नागरिकांमधुन उपस्थित केला जात आहे.
पीएमपीएमएल बस सेवा शिरुरला सुरू करावी यासाठी सुमारे एक हजार विद्यार्थ्यांचा पत्र व्यवहार शिरूर पंचायत समिती, शिरूर नगरपरिषद, सरदवाडी ग्रामपंचायत, कर्डिलेवाडी ग्रामपंचायत, शिरूर ( रामलिंग ) ग्रामपंचायत आदींसह सी.टी.बोरा महाविद्यालय, सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, विद्याधाम प्रशाला शिरूर, न्यू इंग्लिश स्कूल शिरूर, भ्रष्टाचार मुक्त शिरुर अभियान, ग्राम स्वराज्य अभियान, मंगलमूर्ती स्वयंरोजगार सेवा स.संस्था, राष्ट्रीय किसान मजदूरी महासंघ आदींसह विविध संस्था संघटनांच्यावतीने पीएमपीएमएल प्रशासनाला पत्र देऊन मागणी करण्यात आली आहे.
नागरिक व विद्यार्थी, शहरातील शाळा, महाविद्यालये, नगरपरिषद, ग्रामपंचायती विविध संस्था संघटना यांची मागणी पाहता शिरूरला पीएमपीएमएल सेवा सुरू करणे गरजेचे आहे. याबाबत शिरूर तालुका राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) पार्टीच्यावतीने उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित पवार यांना पत्र देऊन मागणी करणार असून दिवाळीच्या आधी शिरूरला पीएमपी बस सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहे. - रविंद्र काळे (अध्यक्ष : शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद